महाराष्ट्रातील नैतिकता संपली का?; चंद्रकांत पाटलांचा संतप्त सवाल
राजकारण

महाराष्ट्रातील नैतिकता संपली का?; चंद्रकांत पाटलांचा संतप्त सवाल

मुंबई : ”महाराष्ट्रातील नैतिकता संपली का?” असा सवाल करत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धनंजय मुंडेंवरील आरोपांवर संताप व्यक्त केला आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार मागे घेतली आहे. दरम्यान यावरुन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

“महाराष्ट्राच्या राजकारणात एखाद्या भयानक गोष्टीला सुद्धा बाजूला कसं ढकलता येईल आणि आपण कसे क्लीन आहोत हे दाखवण्याचा जो प्रय़त्न आहे तो निंदनीय आहे. मुंडेंच्या बाबतीत जी घटना घडली त्यामध्ये भाजपाने सुरुवातीपासूनच तक्रार खरी की खोटी असल्याचं ठरवून मग निर्णय घ्यावा अशी भूमिका घेतली आहे. पण वारंवार आम्ही रेणू शर्मा व्यत्तिरिक्त पीडिता करुणा शर्मा यांच्याबद्दल बोला असं सांगत होतो. धनंजय मुंडे यांनी आपले संबंध असल्याचं तसंच त्यातून मुल असल्याचं आणि प्रतिज्ञापत्रात दोन्ही मुलं दाखवली नाहीत हेदेखील मान्य केलं. हे अनैतिक आणि बेकायदेशीर आहे. त्यामुळे आम्ही राजीनामा मागितला होता,” असं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटलं.

पुढे ते म्हणाले की, ”पण शिताफीने रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतली म्हणजे ते निर्दोष आहेत, त्यांना क्लीन चीट द्या, बदनामी झाली असं दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अरे काय चाललंय काय? महाराष्ट्रातील नैतिकता संपली का?”.

रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेण्याचे कारण काय?
मी धनंजय मुंडे यांच्यावर लग्नाचे वचन आणि बलात्काराचा आरोप केला होता, या संदर्भात माझे हे निवेदन आहे. मला हे स्पष्ट करायचे आहे, की माझी बहीण आणि धनंजय मुंडे यांच्यात काही काळापासून तणाव निर्माण झाला असून कोर्टात खटला सुरू झाल्याने मी मानसिक तणावाखाली होते. मात्र, विरोधी पक्ष त्यांच्याविरूद्ध (मुंडे) जाताना पाहून मला वाटले की मी मोठ्या राजकीय षडयंत्राचा बळी होत आहे. काही लोक माझ्या खांद्यावर बंदुका ठेऊन चालवत आहेत आणि हे सर्व चुकीचे आहे.

मला माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचे नाव वाईट नात्यांपासून दूर ठेवण्यासाठी हे करायचे नव्हते. शेवटी मला एवढेच सांगायचे आहे, की धनंजय मुंडे यांच्याविरूद्ध दाखल केलेली तक्रार मी पूर्णपणे मागे घेत आहे. मला त्याच्याविरुध्द अशी कोणतीही तक्रार द्यायची नाही, कारण मला हे स्पष्ट करावेसे वाटते की मला लग्न आणि बलात्काराच्या आश्वासनाचा भंग करण्याची कोणतीही तक्रार नाही किंवा कोणताही अनुचित फोटो आणि व्हिडिओ नाही. हे विधान मी संपूर्ण जाणीवपूर्वक देत आहे.