ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन काळाच्या पडद्याआड
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन काळाच्या पडद्याआड

ठाणे : मराठी चित्रपट सृष्टीचे जेष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे शनिवारी (ता. ५) निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, सुना, मुलगी, जावई, चार नातवंड असा परिवार आहे. आज सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. काल रात्री पटवर्धनांना श्वास घ्यायला त्रास होत होता. म्हणून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रवी पटवर्धन यांनी मराठी नाटके आणि मराठी चित्रपटांसह मालिकांमध्येही काम केले होते. त्यांची शेवटची गाजलेली भूमिका ही छोट्या पडद्यावरील अगंबाई सासुबाईमधली होती. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. रवी पटवर्धन यांचा जन्म 06 सप्टेंबर 1937 रोजी झाला. बालगंधर्व हे 1944 साली झालेल्या नाट्यमहोत्सवाचे अध्यक्ष होते, तर आचार्य अत्रे हे स्वागताध्यक्ष होते. बालगंधर्वांच्या अध्यक्षतेखालील 1944 साली झालेल्या नाट्यमहोत्सवात वयाच्या साडे सहाव्या वर्षी रवी पटवर्धनांनी पहिल्यांदा रंगभूमीवर पदार्पण केलं. त्यानंतर ते सातत्याने वेगवेगळ्या चित्रपट आणि नाटकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत होते.

रवी पटवर्धनांनी दीडशेहून अधिक नाटकांत आणि 200 हून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. आरण्यक हे नाटक त्यांनी पहिल्यांदा 1974 मध्ये रत्नाकर मतकरींबरोबर केले आणि वयाच्या 82 व्या वर्षीही ते ह्या नाटकात तीच धृतराष्ट्राची भूमिका करत आहेत. भारदस्त व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे त्यांना गावचा ‘पाटील’, ‘पोलीस आयुक्त’, ‘न्यायाधीश’ किंवा खलनायकी भूमिका साकारल्या आहेत.

1974 साली आलेल्या आरण्यक या नाटकाचं पुनरुज्जीवन काही महिन्यांपूर्वी झालं. त्यातही वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी तीच धृतराष्ट्राची भूमिका साकारली होती. सुरवातीच्या काळात रवी पटवर्धन मुंबईच्या रिझव्‍‌र्ह बॅंकेत नोकरी करत होते. वयाच्या ऐंशीव्या वर्षी भगवद्गीतेचे ७०० श्लोक पाठ करून ते शृंगेरी मठाच्या परीक्षेला बसले. शंकराचार्यांनी घेतलेल्या त्या परीक्षेत रवी पटवर्धन पहिले आले होते.