पेट्रोलच्या दरात उच्चांकी वाढ; पाहा आताचे दर
देश बातमी

पेट्रोलच्या दरात उच्चांकी वाढ; पाहा आताचे दर

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय पातळीवर गेल्या १५ दिवसांत तेलाच्या किमती १३ वेळा वाढल्या असून त्याचा भारतातील दरावरही परिणाम झाला आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर लिटरला ८३ रुपये १३ पैसे झाला असून तो दोन वर्षांतील उच्चांकी दर आहे. डिझेलचे दर राज्यातील सात जिल्ह्य़ांत लिटरला ८० रुपये झाले असून महाराष्ट्रातील १९ जिल्ह्य़ांत पेट्रोलचे दर ९० रुपयांच्या वर गेले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पेट्रोलची शनिवारी लिटरला २७ पैसे दरवाढ झाली असून डिझेलचे दर लिटरला २५ पैसे वाढवण्यात आले आहेत. ते दिल्लीत ७३ रुपये ३२ पैसे आहेत. दिल्लीत सप्टेंबर २०१८ पासून पेट्रोल व डिझेलचे दर प्रथमच इतके वाढले आहेत. १६ दिवसांत पेट्रोलचे दर लिटरला २ रुपये ०७ पैशांनी वाढले असून डिझेलचे दर २ रुपये ८६ पैसे याप्रमाणे वाढले आहेत.

लिबियाने तेलाचे उत्पादन वाढवले असून ते दिवसाला ०.१ दशलक्ष पिंपावरून १.२५ दशलक्ष पिंपे झाले आहे. रशियासह ओपेकने जानेवारी २०२१ पासून तेलाचे उत्पादन वाढवण्याचे ठरवले आहे. त्यामुळे तेलाची तूट २०२१च्या पहिल्या तिमाहीत कमी होईल अशी अपेक्षा आहे.

कारण काय?
ऑक्टोबरमध्ये ब्रेन्ट तेलाचे दर कमी होते, पण आता करोनावर लस येण्याच्या शक्यतेने दर ३४ टक्के वाढले आहेत. युरोप व अमेरिकेत कोविड १९ची दुसरी लाट आल्यानंतरही तेलाचे दर वाढले आहेत.

महाराष्ट्रातील दर काय?
डिझेलचे दर नागपूर, परभणी, सोलापूर, अमरावती, औरंगाबाद व बुलढाण्यात ८० रुपयांच्या वर गेले आहेत. पेट्रोलचा सर्वाधिक दर परभणीत ९१ रुपये ९५ पैसे झाला आहे. मुंबईत डिझेलचे दर २४ पैशांनी वाढून ते ७९ रुपये ६६ पैसे झाले आहेत. पेट्रोलचे दर १९ पैशांनी वाढून ८९ रुपये ५२ पैसे झाले आहेत.