संजय राठोडांच्या अडचणी वाढल्या; पूजा चव्हाण प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल
बातमी महाराष्ट्र

संजय राठोडांच्या अडचणी वाढल्या; पूजा चव्हाण प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी माजी वनमंत्री संजय राठोड यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी अॅड. आर. एन. कछवे यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. संजय राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी प्रमुख मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चांगलेच पेटले आहे. विरोधी पक्षाने देखील या प्रकरणाबाबत आक्रमक भूमिका घेतल्याने मंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. आता मुंबई उच्च न्यायालयात संजय राठोड यांच्याविरोधात फौजदारी रीट याचिका दाखल करण्यात आली आहे. यात माजी वनमंत्री संजय राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.

तसेच सदर प्रकरणी पुण्याच्या वानवडी पोलिसांच्या तपासावरही याचिकेतून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. वानवडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी आपला तपास योग्य पद्धतीने केला नसून त्यांनी गुन्हेगारांविरोधात गुन्हा नोंदविण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही याचिकेतून करण्यात आला आहे. या याचिकेवर न्यायमूर्त एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनिष पितळे यांच्या खंडपीठासमोर पुढील आठवड्यात सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या प्रकरणी भाजपच्या महिला आघाडीने याविरोधात मोठे आंदोलन उभे केले. या प्रकरणी संजय राठोड यांच्यावर थेट आरोप करत भाजपने कारवाईची मागणी केली. त्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर राठोड यांचा राजीनामा न घेतल्यास सभागृहात सरकारला तोंड उघडू देणार नाही, असा इशारा दिला. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे राठोड यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनाम दिला. त्यानंतर आता राठोड यांच्यावर गुन्हा दाखल होणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीच स्पष्टता नसताना हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहचलं आहे.