बस आणि रिक्षाच्या अपघातात १३ जणांचा मृत्यू
देश बातमी

बस आणि रिक्षाच्या अपघातात १३ जणांचा मृत्यू

ग्वाल्हेर : मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर शहरामध्ये आज एका बस आणि ऑटो रिक्षाची धडक लागून झालेल्या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी शहरातील जुनी छावणी परिसरामध्ये हा भीषण अपघात झाला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बस आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाल्याने रिक्षाचा चालक आणि रिक्षामधील नऊ महिलांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य तीन जणांचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. पोलीस निरिक्षक असणाऱ्या रवी भदोरिया यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. रिक्षामध्ये प्रामुख्याने महिला प्रवासी होत्या. एका कार्यक्रमाच्या ठिकाणी या महिला स्वयंपाक बनवण्यासाठी जात होत्या. त्याचवेळी समोरुन आलेल्या मोरीनाकडे निघालेल्या बसने रिक्षाला समोरुन धडक दिली.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री चौहान यांनी ट्विटरवरुन घडलेल्या अपघाताबद्दल खेद व्यक्त केला आहे. ग्वाल्हेरमध्ये बस आणि रिक्षाची धडक झाल्याने घडलेल्या अपघातामध्ये अनेकांचे प्राण गेल्याची माहिती मिळाली. मी इश्वराकडे प्रार्थना करतो की या मृतांच्या आत्म्याला शांती मिळावी. तसेच या मृतांच्या नातेवाईकांना हा धक्का सहन करण्याची ताकद परमेश्वर देवो, असं ट्विट चौहान यांनी केलं आहे. चौहान यांनी मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांना चार लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे.