राज्याला मोठा दिलासा; कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्याला मोठा दिलासा; कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढल्यापासून आज (ता. ३१) मोठा दिलासा मिळाला आहे. आज आढळलेल्या नव्या रुग्णांचा आकडा १५ हजारांच्या जवळपास घसरला आहे. याबरोबर आज दिवसभरात मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्याही खाली घसरली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १५ हजार ०७७ इतक्या नव्या कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तर आज एकूण ३३ हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या देखील कमी होत असून ती आज २ लाख ५३ हजार ३६७ वर आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आज राज्यात एकूण १८४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या बरोबर सध्या राज्यातील मृत्यूदर १.६६ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आज ३३ हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण ५३ लाख ९५ हजार ३७० रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.८८ टक्क्यांवर पोहोचले आहे.

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २ लाख ५३ हजार ३६७ इतकी झाली आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ५० लाख ५५ हजार ०५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७ लाख ४६ हजार ८९२ (१६.३९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १८ लाख ७० हजार ३०४ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, १० हजार ७४३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक असली तरी ती देखील घटत आहे. पुण्यात एकूण ३६ हजार ५६३ इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा २४ हजार ८५० इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या १८ हजार ४८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या १८ हजार ५५७ इतकी आहे. नागपूर जिल्ह्यात ही संख्या ११ हजार २५२ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ९ हजार ६३४ इतकी आहे.