काश्मिरात मोठी कारवाई; ४८ तासांत १० अतिरेक्यांचा खात्मा
देश बातमी

काश्मिरात मोठी कारवाई; ४८ तासांत १० अतिरेक्यांचा खात्मा

श्रीनगर : जम्मू काश्मिरमध्ये भारतीय लष्कराने मोठी कारवाई केली आहे. शोपिया सेक्टरमधील हाडीपोरा येथे शनिवारी सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. दुपारी सुरू झालेल्या धुमश्चक्रीत जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. मागील ४८ तासांत लष्कराने हाती घेतलेल्या मोहिमेत १० दहशतवादी ठार झाले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जम्मू काश्मिरमध्ये लष्कराने दहशतवादविरोधी मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. हाडीपोरात लष्कराने शनिवारी शोधमोहीम हाती घेतली होती. यावेळी दहशतवादी जवानांमध्ये चकमक सुरू झाली. दुपारपासून रात्री उशिरापर्यंत गोळीबार होता. दहशतवादी संघटनेत नव्यानं दाखल झालेल्या तरुणाचं मतपरिवर्तन करून शरण येण्याचं आवाहन जवानांकडून करण्यात आलं. त्याचबरोबर तरुणाच्या वडिलांनीही त्याला शरण येण्यासाठी विनवणी केली. मात्र, त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला शरण येण्यापासून रोखलं, असं काश्मीर पोलिसांनी म्हटलं आहे.

ठार झालेले तिन्ही दहशतवादी अल बद्री संघटनेशी संबंधित होते अशी माहिती पोलिसांनी दिली. या चकमकीनंतर सुरक्षा जवानांची परिसरात शोधमोहीम सुरूच आहे. पुलवामात केलेल्या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले होते. तर दक्षिण काश्मिरमध्ये तब्बल चार ठिकाणी सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी उडाल्या आहेत. आतापर्यंत एकूण १० दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले आहे.