ठाण्यात धक्कादायक घटना: पालिका रुग्णालयात २४ तासांत १७ जणांचा मृत्यू, अनागोंदीने जीव गेल्याचा आरोप
बातमी मुंबई

ठाण्यात धक्कादायक घटना: पालिका रुग्णालयात २४ तासांत १७ जणांचा मृत्यू, अनागोंदीने जीव गेल्याचा आरोप

ठाणे : उपचाराअभावी ठाणे पालिकेच्या कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाच रुग्णांच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच आता मागील २४ तासात १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकच गोंधळ उडाला आहे. मृत्यू पावलेल्या रुग्णांना अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात आणले होते. त्यामुळे या रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. मात्र २४ तासांत इतके मृत्यू झाल्याने पालिका रुग्णालयाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कळवा रुग्णालयावर सध्या प्रचंड ताण असून इतर विभागाबरोबर मलेरिया आणि डेंग्यूच्या रूग्णांवरही उपचार सुरू आहेत. त्यातच मागील २४ तासांत १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने रुग्णालय प्रशासनाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्रचंड अनागोंदी, डॉक्टरांची अपुरी क्षमता आणि रुग्णांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे. तर यातील १३ रुग्ण हे आयसीयूमधील तर ४ रुग्ण जनरल वॉर्डमधील होते. १० ऑगस्ट रोजी एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड आणि इतर पक्षांनी रुग्णालयात जाऊन आंदोलन केले होते.

‘मृत्यू पावलेल्या रुग्णांना अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते. यातील एका रुग्णाने विष प्राशन केले होते, तर एकाला सर्पदंश झाला होता. प्रत्येक रुग्णाच्या मृत्यूचे कारण वेगवेगळे आहे,’ असं छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची तसेच हॉस्पिटलने संपूर्ण हॉस्पिटलचे ऑडिट करून माहिती जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.