तरच गांधीजींच्या स्वराज्याचा अर्थ समजेल – सरसंघचालक
बातमी विदर्भ

तरच गांधीजींच्या स्वराज्याचा अर्थ समजेल – सरसंघचालक

नागपूर : माझी देशभक्ती माझ्या धर्मातून येते, असे महात्मा गांधी म्हणत. स्वधर्म समजला तरच गांधीजींच्या स्वराज्याचा अर्थ समजेल, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. सेंटर फॉर पॉलसी स्टडीज या सामाजिक संशोधन केंद्रातर्फे जे. के. बजाज आणि एम. डी. श्रीनिवास या लेखकद्वयींच्या मेकिंग ऑफ हिंदू पेट्रियट या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी भागवत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. प्रकाशन कार्यक्रमात कांचीपीठाचे शंकराचार्यही दूरचित्रसंवाद माध्यमाद्वारे सहभागी झाले होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

महात्मा गांधींनी हिंद स्वराजमध्ये मांडलेल्या विचारांचा वेध घेताना, धर्म आणि देशभक्ती यांच्या परस्पर संबंधांवर भाष्य केले आहे. महात्मा गांधी हे हिंदू देशभक्त होते, अशी मांडणी करताना गांधीजींचे विचार, लिखाण, भाषणे आदींचे साह्य़ घेतले गेले आहे. हिंदू हा देशभक्त असतोच. देशभक्त असणे हे हिंदूंच्या नसानसात भिनलेले असते. हिंदू भारतद्रोही असू शकत नाही, अशी ‘हिंदू देशभक्त या शब्दाची भागवत यांनी उकल केली.

गांधीजींना स्वराज्याच्या संकल्पनेत केवळ ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य नको होते, मूल्यांची पुनस्र्थापना अपेक्षित होती. परंपरागत ज्ञान भारताकडे आहे, तुम्ही (ब्रिटिश) इथून जा, आम्ही पुन्हा उभे राहू असे गांधीजी म्हणत असत. स्वातंत्र्यसंग्राम हा दोन संस्कृतींमधील संघर्षही होता, असे विचार भागवत यांनी मांडले. माझ्या अंतरात्म्याची तहान भागवण्यासाठी माझा धर्म आहे, असे गांधीजी म्हणत. गांधीजींचा अहिंसेचा विचार अनुकरणीय असला तरी, आता तो प्रत्यक्षात आलेला दिसत नाही. निर्भय असल्याशिवाय अहिंसा आचरणात येऊ शकत नाही. हिंदूंनी हिंसेने प्रतिकार करू नये. सर्व हिंदू नष्ट झाले तरी मी राहीन असे गांधीजी म्हणत. त्यातून त्यांची हिंदू धर्मावरील निष्ठा दिसते. असेही भागवत यांनी सांगितले.