महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागात आणि अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठात सामंजस्य करार
बातमी मुंबई

महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागात आणि अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठात सामंजस्य करार

मुंबई : महाराष्ट्र हे आयव्ही लीग युनिव्हर्ससिटी अमेरीकेतील कॉर्नेल विद्यापीठ, न्यूयॉर्क यांच्या सहयोगाने उद्योजक / स्टार्ट अप्ससाठी मुंबईत जागतिक दर्जाचे बिझनेस इन्क्युबेटर स्थापन करण्याकरीता पुन्हा एकदा आघाडीवर आहे. जागतिक दर्जाचा बिझनेस अॅक्सिलेटर कॉर्नेल महा 60 ची महाराष्ट्रातील उद्योजकांकरीता नवी मुंबई येथे स्थापना करण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

डॉ. हर्षदीप कांबळे (आयएएस), विकास आयुक्त, उद्योग विभाग, महाराष्ट्र शासन
यांच्या मागील दोन वर्षांच्या प्रयत्नाने, कॉर्नेल विद्यापीठ, अमेरिका यांनी 10 डिसेंबर 2020 रोजी सामंजस्य करार एक इंटरनॅशनल बिझनेस इन्क्युबेटर अत्याधुनिक सुविधा असलेल्या कॉर्नेल महा 60 कार्यक्रम रिलायन्स आयटी पार्क, नवी मुंबई येथे 13,000 स्क्वे. फूट क्षेत्रावर स्थापन करण्याचे मान्य केले असून तसा करार केला आहे.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली स्वाक्षरी सोहळा आयोजित करण्यात आला होता आणि डॉ. हर्षदीप कांबळे (आयएएस), विकास आयुक्त (उद्योग) व पॉल क्राउस, व्हाईस प्रोव्होस्ट, कॉर्नेल विद्यापीठ यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केले की, उद्योजक/स्टार्ट-अप्ससाठी जागतिक दर्जाची सुविधा असलेले बिझिनेस इनक्यूबेटर सेंटर नवी मुंबईमध्ये स्थापित करणे हे महाराष्ट्र सरकारचे खूप मोठे आणि नाविन्यपूर्ण पाऊल आहे. राज्यात नवीन तांत्रिक, उच्च कुशल मनुष्यबळ आणि नाविन्यपूर्ण कल्पना असलेले तरुण उद्योजक आहेत. सदर बिझनेस अॅक्सिलेटर महिलांसह विविध विभागातील समावेश असलेल्या तरुणांसह महाराष्ट्र राज्यातील प्रारंभिक विकासाला उत्तेजन देण्याचे उद्दीष्ट ठेवून या व्यवसायाचा वेग देणारी यंत्रणा बनविण्यात आल्याचे सांगताना त्यांनी डॉ. हर्षदिप कंबळे यांचे विशेष कौतुक केले.

डॉ. हर्षदीप कांबळे म्हणाले, ‘कॉर्नेल हे जगप्रसिध्द विद्यापीठ प्रथमच अमेरिकेबाहेर अशा प्रकारचे जागतिक दर्जाचा बिझनेस अॅक्सिलेटर स्थापन करीत आहे आणि अशा प्रकारचा भारतातील प्रथम प्रमाणित कोर्स आहे. कॉर्नेल महा 60 हा कार्यक्रम या एक्सेलेरेटर अंतर्गत चालणार असून तो जवळजवळ वर्षभर निवडक 60 उद्योजकांना प्रशिक्षण देईल आणि त्यांना कॉर्नेल विद्यापीठ यांच्याकडून पदविका प्रमाणपत्रासह मूर्त व अमूर्त फायदे प्रदान केले जाणार आहेत. तसेच, त्यांना मार्गदर्शन केले जाईल आणि उद्यम भांडवल निधी सारखी साधनेदेखील उपलब्ध करुन दिली जातील. हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर प्रथम तीन वर्षांसाठी राबवला जाईल. प्रशिक्षणार्थी/उद्योजक संपूर्ण महाराष्ट्रातून निवडले जातील आणि विकास आयुक्त (उद्योग) यांच्या मार्गदर्शनाखाली कॉर्नेल टीमद्वारे त्यांची निवड केली जाईल. उच्च व तंत्रशिक्षण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, नॅसकॉम, कौशल्य विकास, आदिवासी विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य आदी विभागही या महत्वाकांक्षी प्रकल्पात सहभागी होतील. एमआयडीसीद्वारे या इनक्यूबेटर केंद्राचा सर्व खर्च उचलण्याचे निर्देश दिले आहेत. निवड झालेल्या उद्योजकाला कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचे कांबळे यांनी स्पष्ट केले.

व्हाईस प्रोव्होस्ट पॉल यांनी महाराष्ट्र शासन आणि कॉर्नेल विद्यापीठ यांच्यातील सामंजस्य करार हा स्वाक्षरी सोहळा ऐतिहासिक असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. त्याचबरोबर फॅकल्टी डायरेक्टर कॉर्नेल महा 60 प्रो. ॲलन यांनी बऱ्याच वर्षांनी या मास्टर सर्व्हिस करारावर स्वाक्षरी होत असल्याने त्यांना खूप आनंद झाला असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी कॉर्नेल महा ६० कार्यक्रमाबाबत दूरदृष्टी व सतत पाठपुरावा केल्याबद्दल विकास आयुक्त (उद्योग) डॉ. हर्षदिप कंबळे यांचे कौतुक केले.

यावेळी राज्यमंत्री (उद्योग) कु. अदिती तटकरे, प्रधान सचिव (उद्योग) वेणुगोपाल रेड्डी (आयएएस), महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगण (आयएएस), प्राध्यापक संचालक कॉर्नेल महा 60 प्रोफेसर ॲलन, कॉर्नेलचे प्रकल्प व्यवस्थापक डेव्हिन बिगॉनेस आणि मिस्टर जॉन कॅलेलिल एक्सईडी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, सिंगापूर हे संयुक्तपणे उपस्थित होते.