देशात काँग्रेसला संपवण्याचा मोठा कट सुरु आहे; कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा आरोप
राजकारण

देशात काँग्रेसला संपवण्याचा मोठा कट सुरु आहे; कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा आरोप

मुंबई : देशात काँग्रेसला संपवण्याचा मोठा कट सुरु आहे. इतकंच नाही तर शरद पवार यांना युपीए अध्यक्ष करण्याची चर्चा हा राहुल गांधींविरोधातील मोहिमेचा भाग आहे. असा गंभीर आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी केला आहे. राज्यात आणि देश पातळीवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना युपीएचे अध्यक्ष करण्याची चर्चा रंगली होती. लवकरच शरद पवार युपीएच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्विकारतील असा दावा केला जात आहे. या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मात्र, संजय निरुपम यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “दिल्लीपासून मुंबईपर्यंत राहुल गांधींविरोधात एक मोहिम सुरु असून शरद पवार यांना युपीए अध्यक्ष करण्याची चर्चा हा त्याचाच एक भाग आहे. याच मोहिमेअंतर्गत २३ स्वाक्षऱ्या असणारी चिठ्टी लिहिण्यात आली होती. यानंतर राहुल गांधींच्या नेतृत्वात सुसंगततेची कमतरता शोधण्यात आली. काँग्रेसला संपवण्याचा एक मोठा कट आहे”.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसनेदेखील या चर्चेत तथ्य नसल्यचे म्हंटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तापसे यांनी याबाबत खुलासा केला आहे. शरद पवारांसंबंधीच्या बातम्या निराधार असल्याचं सांगत वृत्त फेटाळून लावलं आहे. तसेच, प्रसारमाध्यमांनी निर्धास्तपणे शरद पवार युपीएचे नवे अध्यक्ष होणार असल्याचं वृत्त दिलं आहे. मात्र, युपीएमध्ये अशा प्रस्तावासंबंधी कोणतीही चर्चा झालेली नाही, असं महेश तपासे यांनी म्हटलं आहे.

त्याचबरोबर, “सध्या देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन लक्ष हटवण्यासाठी काहीजणांनी हेतू परस्पर ही बातमी पेरली असल्याचं दिसत आहे. माध्यमांमध्ये अशा प्रकारच्या बातम्या जाणीवपूर्वक पसरवल्या गेल्या आहेत. शेतकरी आंदोलनावरून जनतेचं लक्ष वेधण्यासाठी काही जणांकडून हेतूपुरस्सर अशा बातम्या पेरल्या जात आहेत, असं तपसे यांनी स्पष्ट केलं.