का निष्फळ ठरतेय शेतकरी नेत्यांशी होणारी प्रत्येक बैठक; कृषिमंत्र्यांनी सांगितले कारण
देश बातमी

का निष्फळ ठरतेय शेतकरी नेत्यांशी होणारी प्रत्येक बैठक; कृषिमंत्र्यांनी सांगितले कारण

नवी दिल्ली : दिल्लीतील शेतकरी आंदोलनामागे अदृश्य शक्ती आहेत, शेतकरी आणि सरकारमधील तणाव संपू नये असं काही अदृश्य शक्तींना वाटतं, असे धक्कादायक वक्तव्य केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केले आहे. हिंदी वृत्तवाहिनी ‘आज तक’शी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. आतापर्यंत शेतकरी आणि सरकारमध्ये ११ वेळा बैठक झाली आहे. मात्र यातून कोणताही तोडगा निघालेला नसल्याने तोमर यांनी असे बोलल्याचे म्हंटले जात आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

याबाबत नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, ‘शेतकऱ्यांनी पंजाबमध्ये रेल्वे रुळांवर आंदोलन सुरू केल्यापासूनच आम्ही त्यांच्याशी संवाद साधण्याचे प्रयत्न सुरू केले. शेतकऱ्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागू नये याची आम्ही पूर्ण काळजी घेतली. या विषयात तोडगा निघावे यासाठी आमच्याकडून अनेकदा प्रयत्न केले गेले,’ असं तोमर म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, आम्ही आंदोलक शेतकऱ्यांना बैठकांच्या माध्यमातून अनेक प्रस्ताव दिले. शुक्रवारी आमची शेतकऱ्यांसोबत बैठक झाली. त्याआधीच आम्ही त्यांना सरकार दोन वर्षांसाठी कायद्यांना स्थगिती देण्यास तयार असल्याचं सांगितलं होतं. याबद्दलचा प्रस्ताव सरकारकडून देण्यात आला. मात्र तो त्यांनी अमान्य केला. तुम्ही सरकारला प्रस्ताव द्या, असं आवाहन सरकारकडून शेतकऱ्यांना करण्यात आलं. मात्र शेतकऱ्यांनी कोणताही प्रस्ताव दिला नाही, याकडे तोमर यांनी लक्ष वेधलं.

तसेच, शेतकरी संघटना केवळ कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करतात. ते कायद्यांच्या फायद्यांबद्दल बोलतच नाहीत. इतकेच नव्हे तर, शेतकरी आणि सरकारमधील तणाव संपू नये असं काही अदृश्य शक्तींना वाटतं. असा दावा त्यांनी केला. या अदृश्य शक्ती कोण आहेत, याबद्दल विचारलं असता केंद्रीय कृषी मंत्र्यांनी त्यावर भाष्य करणं टाळलं. शेतकऱ्यांना कृषी कायद्यांचे फायदे जाणूनच घेण्याची इच्छाच नाही. त्यामुळे आतापर्यंतच्या बैठका निष्फळ ठरल्या, असं तोमर यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन आम्ही संवेदनशीलपणे हाताळण्याचा पूर्ण प्रयत्न केल्याचं तोमर यांनी सांगितलं.