चीन सरकारवर टीका केल्याने अलीबाबाचे संस्थापक जॅक मा दोन महिन्यापासून बेपत्ता
बातमी विदेश

चीन सरकारवर टीका केल्याने अलीबाबाचे संस्थापक जॅक मा दोन महिन्यापासून बेपत्ता

चीन :  चीनच्या बँकिंग व्यवस्थेवर टीका केल्यापासून अलीबाबाचे संस्थापक जॅक मा गेल्या दोन महिन्यापासून बेपत्ता आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जाणऱ्या व्यक्तींमध्ये जॅक मा यांचे नाव आहे. ‘आफ्रिका बिझनेस हिरोज’ या त्यांच्या स्वतःच्याच टॅलेंट शोमध्येही ते उपस्थित न राहिल्याने हा संशय अधिकच बळावला आहे. तर कोरोना काळात विविध देशांना मदत करणारे जॅक मा अचानक बेपत्ता झाल्यामुळे चीनच्या हुकुमशाहीवर पुन्हा एकदा जगभरातून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जॅक मा यांनी २४ ऑक्टोबर रोजी बीजिंगमध्ये झालेल्या भाषणात जॅक मा यांनी चीनच्या बँकिंग व्यवस्थेवर, व्यापारांवर आणि अर्थव्यवस्थेवर सडकून टीका केली होती. तसेच, जॅक मा यांनी चीन सरकारला आव्हान दिलं होतं. मात्र जॅक मा यांच्या भाषणानंतर सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने कारवाईचा बडगा उगारला. जॅक मा यांनी स्थापन केलेला अलिबाबा समूहावर कारवाई करण्यात आली होती. एवढंच नाहीतर जॅक मा यांच्या इतर उद्योगांवरही कारवाई करण्यात आल्याचं मीडिया रिपोर्ट्समधून समोर येत आहे.

दरम्यान, यूके टेलिग्राफने दिलेल्या माहितीनुसार, जॅक मा हे आफ्रिका बिझनेस हिरोज कार्यक्रमाचे परीक्षक होते. पण नोव्हेंबरमध्ये झालेल्या फेरीत त्यांच्या जागी अलीबाबा समुहाच्या कार्यकारी अधिकाऱ्याने हजेरी लावली, त्यांनंतर त्यांचा फोटोही वेबसाइटवरुन काढून टाकण्यात आला. वेळेअभावी जॅक मा यांना सहभाग घेता आला नाही असं अलीबाबा समुहाच्या प्रवक्त्याने सांगितलं होतं.

तसेच, जॅक मा यांना चिनी सरकारसोबत झालेल्या वादानंतर शोमधील परिक्षकांच्या पॅनलमधून पायउतार करण्यात आलं. दरम्यान, या शोच्या फायनलपूर्वी काही आठवड्यांआधी जॅक मा यांनी एक ट्वीट केलं होतं. त्या ट्वीटमध्ये ते म्हणाले होते की, ते सर्व स्पर्धकांच्या भेटीची प्रतिक्षा करु शकत नाहीत. त्यानंतर पासून त्यांच्या तिनही ट्विटर अकाउंटवरुन एकही ट्वीट करण्यात आलेलं नाही.

वॉल स्ट्रीट जनरलच्या रिपोर्टनुसार, नोव्हेंबर महिन्यात चिनी अधिकाऱ्यांनी जॅक मा यांच्या एंट ग्रुपचे 37 अब्ज डॉलर्सचे आयपीओ निलिंबित केले. जॅक मा यांच्या एंट ग्रुपचे आयपीओ रद्द करण्याचे आदेश थेट चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या वतीने देण्यात आले होते. त्यानंतर ख्रिसमसच्या आदल्या दिवशी जॅक मा यांच्यावर देशाबाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली. जोपर्यंत अलिबाबा समूहावर करण्यात आलेली कारवाई सुरु आहे, तोपर्यंत जॅक मा देशाबाहेर जाऊ शकत नाहीत, असं चिनी अधिकाऱ्यांनी जॅक मा यांना सांगितलं होतं.

चिनी सरकारच्या विरोधात वक्तव्य केल्यामुळे चिनमधील सत्ताधाऱ्यांनी जॅक मा यांचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न केला असल्याचं बोललं जात आहे. परंतु, चिनमध्ये हे पहिल्यांदाच घडत नसून याआधीही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. याआधीही सरकार विरोधात बोलणाऱ्या अनेकांना चिनमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. याआधी शी जिनपिंग सरकारवर टीका करणारे प्रॉपर्टी बिजनसमन रेन झिकियांग अचानक बेपत्ता झाले होते. त्यांनी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी शी जिनपिंग यांना सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांना 18 वर्षांसाठी कारागृहात पाठवण्यात आलं होतं. चीनचे अरबपती शिआन जिआनहुआ वर्ष 2017 पासून नजरकैदेत आहेत.