पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी राजेश पाटील यांची नियुक्ती
पुणे बातमी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी राजेश पाटील यांची नियुक्ती

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची बदली करण्यात आली आहे. त्याच्या जागी आता ओरिसा केडरचे 2005 च्या आयएएस बॅचचे अधिकारी राजेश पाटील हे पिंपरी-चिंचवडचे नवे आयुक्त असणार आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मर्जीतील सनदी अधिकारी श्रावण हर्डीकर यांची नागपूरहून पिंपरी-चिंचवडला महापालिका आयुक्तपदी बदली केली होती.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पिंपरी-चिंचवडचे नवे आयुक्त राजेश पाटील हे मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विश्वासातील आहेत. ओरिसा केडरचे 2005 च्या आयएएस बॅचचे अधिकारी असलेल्या पाटील यांना खास आंतरराज्य प्रतिनियुक्तीवर आणण्यात आले आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी हर्डीकर यांचा तीन वर्षांचा कालखंड पूर्ण झाला होता पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने बदली लांबणीवर पडली होती. हर्डीकर हे आतापर्यंतच्या आयुक्तांत सर्वाधिक वादग्रस्त ठरलेले आहेत. तरीही ते मुदत संपूनही आयुक्त म्हणून राहिले होते, हे विशेष. ते तब्बल साडेतीन वर्ष आयुक्त म्हणून राहिले. कोरोनाने त्यांची बदली वर्षभर लांबवली होती. ते पालिकेतील सत्ताधारी भाजपच्या कलाने कारभार करतात, असा आरोप विरोधी पक्ष शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला होता.

कोण आहेत राजेश पाटील
राजेश पाटील ओळख स्टॅटेस्टिकल सर्व्हिसेसमध्ये राजेश यांची निवड झाली होती. पण, त्यांना आयएएस अधिकारीच व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी आपली मेहनत सोडली नाही. २००५मध्ये ते यूपीएससी पास झाले आणि त्यांची पहिली नियुक्ती ओडिशातील कोटापूरमध्ये अठगढ येथे विभागीय न्यायदंडाधिकारी म्हणून झाली. ओडिशामध्ये काम करताना २००८मध्ये महा नदीला पूर आला होता. त्यावेळच्या बचाव कार्यात राजेश पाटील यांचे खूप मोठे योगदान आहे. पाटील यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. पाटील यांनी आत्मचरित्रपर पुस्तकाचे लेखन केले आहे.

तथापि, महापालिका निवडणूक वर्षभरावर आल्याच्या पार्श्वभूमीवर पाटील यांची नियुक्ती झाल्याने त्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले जात आहे. सत्ताधारी भाजप राजवटीत पहिला एफडीआर व आता कचरा घोटाळा समोर आला आहे. त्याशिवाय कोरोना साहित्य खरेदीत कोट्यवधीचा गैरव्यवहार झाल्याचा आरोपही झाला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या तोंडावर फडणवीस समर्थक हर्डीकरांची बदली करण्यात येऊन तेथे ठाकरे आणि पवारांच्या मर्जीतील पाटील यांना आणण्यात आले आहे.