तुम्ही लवकरच येरवडा जेलमध्ये जाणार आहात?
बातमी महाराष्ट्र

तुम्ही लवकरच येरवडा जेलमध्ये जाणार आहात?

नागपूर : देशाच्या आणि राज्याच्या इतिहासात राज्यात असलेल्या येरवडा आणि इतर तुरुंगांचं खूप महत्व आहे. अनेक ऐतिहासिक घटना इथे घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या 26 जानेवारीला पुण्यातील येरवडा तुरुंगात ‘जेल पर्यटन’ सुरु करत आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन होणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, ”भारतात पहिल्यांदाच जेल पर्यटन हा उपक्रम सुरु केला जात आहे. “शाळा, कॉलेज व शैक्षणिक अस्थापना तसंच नोंदणीकृत अशासकीय संस्थाना ही ऐतिहासिक ठिकाणी पाहता यावीत या दृष्टीकोनातून गृह विभागाद्वारे जेल पर्यटन सुरु करण्यात येत आहे. विद्यार्थी, इतिहास अभ्यासक आणि सामान्य नागरिकांना या उपक्रमात जेलमध्ये जाऊन ऐतिहासिक घटनांची माहिती घेता येईल. पहिल्या टप्प्यात येरवडा तुरुंगातून याची सुरुवात करत आहोत. तसेच येरवडा कारागृहापाठोपाठ राज्यातील इतरही कारागृहांमध्ये अशाच प्रकारे पर्यटन सुरु करण्याचा विचार असल्याचं मंत्री अनिल देशमुखांनी सांगितलं आहे.

स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील मोठा भाग हा येरवडा कारागृहाशी जोडला गेलाय. या जेल पर्यटनाच्या माध्यमातून नागरिकांना येरवडा कारागृहाची सफर घडवण्यात येणार आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक महत्त्वाच्या खटल्यांमधे दोषी ठरलल्या गुन्हेगारांना या कारागृहात फाशी देण्यात आली. देशाचे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांचे मारेकरी असलेल्या जिंदा आणि सुखा यांना येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली होती. तर महात्मा गांधी यांच्यासह अनेक नेते स्वातंत्र्य चळवळीदरम्यान येरवडा कारागृहात बंदिस्त होते. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधील पुणे करार देखील येरवडा कारागृहातच पार पडला होता. मुंबई हल्ल्यातील दोषी अजमल अमीर कसाब यालाही येरवडा कारागृहातच फाशीवर लटकवण्यात आलं होतं.

मात्र या पर्यटनासाठी काही अटीदेखील आहेत.
१.एकावेळी 50 व्यक्तींना या कारागृह पर्यटनासाठी तुरुंगामध्ये सोडण्यात येईल. तुरुंग प्रशासनाकडून गाईड देखील पुरवण्यात येणार.
२. किमान सात दिवस आधी इच्छुकांना ऑनलाईन पद्धतीनं किंवा येरवडा कारागृहाच्या कार्यालयात जाऊन प्रत्यक्षपणे बुकींग करावं लागणार
३. या कारागृह पर्यटना दरम्यान कोणतीही वस्तू , मोबाईल किंवा कॅमेरा आतमध्ये नेता येणार नाही.
४. कारागृहात गेलेल्या पर्यटकांचे फोटो काढण्याची सोय करण्यात येणार असून आतमध्ये काढलेले फोटो पर्यटकांना नंतर पुरवण्यात येणार आहेत.