कोव्हॅक्सिन ७७.८ टक्के प्रभावी; तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीच्या आधारे दावा
देश बातमी

कोव्हॅक्सिन ७७.८ टक्के प्रभावी; तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीच्या आधारे दावा

नवी दिल्ली : कोव्हॅक्सिन लस ७७.८ टक्के प्रभावी असल्याचा दावा भारत बायोटेकने तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीच्या आधारे केला आहे. कोव्हॅक्सिन लस घेतली असता वेगाने पसरणाऱ्या डेल्टा व्हेरियंटविरोधात ६५.२ टक्के सुरक्षा मिळते असाही दावा भारत बायोटेकचा आहे. याशिवाय कोरोनाच्या इतर लक्षणांविरोधात ९३.४ टक्के प्रभावी असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. भारत बायोटेकने आयसीएमआर आणि एनआयव्ही पुणेसोबत भागीदारी करत करोनाविरोधातील कोव्हॅक्सिन लसीची निर्मिती केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारत बायोटेकने करोनाची लक्षणं असणाऱ्या १३० जणांची चाचणी केली आहे. गेल्या दोन आठवड्यात देशभरातील एकूण २५ ठिकाणी ही चाचणी पार पडली. चाचणीमध्ये सहभागी झालेल्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला होता. लसीचा परवाना मिळालेल्या कोणत्याही कंपनीने संसर्गाविरोधात इतकी कार्यक्षमता दाखवलेली नसून यामुळे कोरोना संसर्गाचा दर कमी होण्यास मदत मिळेल असं कंपनीने म्हटलं आहे.

भारत बायोटेकच्या सह-संस्थापक सुचित्रा इल्ला यांनी ट्वीट करत भारताला वैज्ञानिक दृढनिश्चय, क्षमता आणि वचनबद्धतेसह जागतिक नकाशावर ठेवल्याचा आम्हाला अभिमान असल्याचं म्हटलं आहे. भारत बायोटेकने लक्षणं असणाऱ्या २५ शहरांमधील १८ ते १८ वयोगटातील एकूण १३० जणांवर वैद्यकीय चाचणी केली. यावेळी १२ टक्के लोकांना थोडा त्रास जाणवला तर ०.५ टक्क्यांपेक्षा कमी लोकांना गंभीर त्रास जाणवला अशी माहिती कंपनीने दिली आहे.