#भारतबंद : देशातील शेतकरी संघटनांसह राजकीय पक्षाचा पाठींबा; तर काय सुरु आणि काय राहणार बंद
देश बातमी

#भारतबंद : देशातील शेतकरी संघटनांसह राजकीय पक्षाचा पाठींबा; तर काय सुरु आणि काय राहणार बंद

नवी दिल्ली : देशभरात मोदी सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीतील आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांनी भारत बंद ची घोषणा केली आहे. या भारत बंद’ला राज्यातील महाविकास आघाडीसह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे. गेल्या 12 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्‍या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. अशा परिस्थितीत 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ कसा होईल, हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मोदी सरकारच्या ‘या’ तीन कायद्यांना शेतकऱ्यांचा विरोध
1. मूल्य उत्पादन आणि कृषी सेवा अधिनियम, 2020
2. आवश्यक वस्तू (संशोधन) अधिनियम, 2020
3. शेतकऱ्यांचं उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (संवर्धन आणि सुविधा) अधिनियम, 2020

भारत बंद’ला बँक संघटनांचा पाठींबा
राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटनांशिवाय या बंदला अनेक बॅंक कर्मचारी संघटनांनी देखील पाठिंबा दिला आहे. बॅंक यूनियन्सने सरकारला लवकरात लवकर या मुद्द्यावर तोडगा काढावा असं आवाहन केलं आहे. ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉइज असोसिएशन (एआयबीईए)नं म्हटलं आहे की, सरकारने पुढं येऊन देश आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या मागण्यांवर विचार करुन समाधान केलं पाहिजे.

तीन वाजेपर्यंत चक्का जाम राहील
शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी ‘भारत बंद’च्या दिवशी सकाळी आठ ते संध्याकाळपर्यंत देशव्यापी बंद राहणार आहे. यासह सकाळी आठ ते दुपारी तीन या वेळेत एकूण रहदारी ठप्प होईल. अशा परिस्थितीत, जर आपण या दिवशी बाहेर पडणार असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा. याशिवाय केवळ अत्यावश्यक सेवा, रुग्णवाहिका आणि लग्नासाठीच्या गाड्यांना न थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दूध-फळ-भाजीच्या सेवेवर बंदी
8 डिसेंबरच्या भारत बंदच्या दिवशी शेतकरी संघटनांनी दूध, फळे आणि भाजीपाल्याच्या सेवा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, रविवारी दिल्लीत निषेध करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांचा अकरावा दिवस आहे.

माथाडी कामगारांचा पाठिंबा
8 डिसेंबरच्या भारत बंदच्या च्या दिवशी एपीएमसीच्या सर्व बाजारपेठा सहभागी होणार असून त्या दिवशी संपूर्ण बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे. तसेच व्यापारी व माथाडी कामगारांवर बेकारीचे संकट ओढावणार आहे. त्यामुळे या विरोधात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश राज्यांतील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. देशातील बळीराजाला साथ देण्यासाठी या संपात सहभागी होणार असल्याचे माथाडी कामगार नेते आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी घोषित केले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद राहणार
दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील मुंबई, नाशिक, लासलगाव, सोलापूर या ठिकाणी असलेल्या बाजार समित्यांसह राज्यातील अनेक बाजार समित्यांनी उद्या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचं सांगितलं आहे. बाजार समितीतील अडते, व्यापारी, हमाल, माथाडी कामगार यांची एकत्रित बैठक झाली. या बैठकीत कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय एकत्रित घेण्यात आला आहे.

‘भारत बंद’ला अनेक पक्षांचे समर्थन
शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला देशातील अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, बसपा, पीएजीडी, एसीपी, सीपीआई, सीपीएम, सीपीआई (एलएल), आरएसपी, आरजेडी, डीएमके, एआयएफबी, जेएमएम, टीआरएस, आम आदमी पार्टी, राष्ट्रीय लोकशाही पार्टी यामध्ये प्रमुख पक्षांचा समावेश आहे. राजस्थानचे खासदार आणि आरएलपीचे नेते हनुमान बेनीवाल यांनी तर 8 डिसेंबरनंतर एनडीएकडे रहायचे की नाही याबाबत आपण निर्णय घेणार असल्याचेही म्हटले आहे.

चर्चेविना अंमलात आणलेल्या कृषी कायद्याला महाविकास आघाडीचा विरोध
केंद्र सरकारने चर्चेविना अंमलात आणलेल्या जाचक कृषी कायद्याविरोधात तीव्र आंदोलनासाठी शेतकरी संघटनांनी 8 डिसेंबर रोजी राष्ट्रव्यापी ‘भारत बंद’ पुकारला आहे. या ‘भारत बंद’ला महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे समर्थन देत आहे, असं जयंत पाटलांनी सांगितलं आहे. तर कोरोनामुळे देशच बंद असल्याची स्थिती वर्षभर होती, परंतु या संकटाच्या काळातही देशातील शेतकरी कर्तव्यभावनेने शेतावर राबत होता हे विसरता येणार नाही. त्यामुळे शेतकरी जर आपल्या मागण्यांसाठी एक दिवसाचा बंद करत असतील तर जनतेने स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी होऊन आपल्या अन्नदात्याच्या मागे ठामपणे उभे राहावे, असे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.