पुण्यातील भाजप नगरसेवक पूरग्रस्तांसाठी देणार एक महिन्याचं मानधन
पुणे बातमी

पुण्यातील भाजप नगरसेवक पूरग्रस्तांसाठी देणार एक महिन्याचं मानधन

मुंबई : पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. महापूर, भूस्खलनामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले. संसारच्या संसार उध्वस्त झाले. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सर्व आमदार-खासदार पूरग्रस्तांना एक महिन्याचे वेतन देणार असल्याचे घोषणेनंतर पुण्यातील भाजपचे सर्व नगरसेवक एक महिन्याचे वेतन देणार असल्याचे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी जाहीर केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ज्या भागांमध्ये सध्या पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, तेथील नागरिकांच्या आर्थिक मदतीसाठी पुण्यातील भाजप नगरसेवकांनी पुढाकार घेतला आहे. पुणे महापालिकेतील भाजपाच्या सर्व नगरसेवकाचं एक महिन्याचे मानधन पूरग्रस्त भागासाठी देण्याचा निर्णय घेतला, असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.

मोहोळ म्हणाले, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अलिबाग, रायगड, सातारा, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यात महापुरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून असंख्य नागरिक जखमी देखील झाले आहेत. त्यात शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. यातून बाहेर येण्यास काळ लागणार आहे. हे लक्षात घेऊन, तेथील नागरिकांसाठी आर्थिक मदत म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार पुणे महापालिकेतील भाजपाच्या सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.