अखेर तो दिवस उजेडलाच! राज्यासह देशभरात आजपासून देशभरात कोरोना लसीकरणाला सुरवात
देश बातमी

अखेर तो दिवस उजेडलाच! राज्यासह देशभरात आजपासून देशभरात कोरोना लसीकरणाला सुरवात

देशभरात आजपासून जगातील सर्वात मोठ्या कोविड लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना महामारी विरोधातील युद्धात भारताचे आज महत्वपूर्ण पाऊल पडत आहे. कोरोनावरील प्रत्यक्ष लसीकरणास अखेर आजपासून (ता.१६) सुरूवात होत असून सकाळी १०.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन होणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोरोना महामारीच्या काळात कार्यरत असणाऱ्या कोरोना योद्ध्यांना पहिल्या दिवशी कोविड-19 लस दिली जाणार आहे. त्यापैकी काही जणांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. लसीकरण मोहिमेच्या प्रारंभावेळी लशींचा पुरवठा आणि वितरणावर देखरेख ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘को-विन’ अ‍ॅपचे लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

तर महाराष्ट्रातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते आज सकाळी ११.३० वाजता मुंबई महापालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलात राज्याव्यापी लसीकरण मोहिमेची सुरुवात होणार आहे. मुंबईमधील एकूण ९ केंद्रांवरील ४० बूथवर लसीकरण केले जाणार आहे.

आरोग्य क्षेत्रातील जवळपास तीन कोटी कर्मचाऱ्यांना २९३४ केंद्रांवर लस टोचण्यात येणार आहे. एका केंद्रावर दररोज एका सत्रात १०० जणांचे लसीकरण करण्याची सूचना राज्यांना देण्यात आली आहे.केंद्र सरकारने राज्यांना लसीकरणासंबंधी नियमावली पाठवली आहे. या नियमावलीत लसीकरणादरम्यान कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि कोणत्या नाही याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.

लसीकरणासाठी वयोमर्यादा आखण्यात आलेली असून १८ पेक्षा जास्त वय असलेल्यांनाच यामध्ये सहभागी करुन घेण्यास सांगण्यात आलं आहे. याशिवाय गरोदर माता किंवा ज्यांना गरोदरपणाबद्दल नक्की माहिती नाही तसंच स्तनपान करणाऱ्या मातांचं लसीकरण करु नये असं केंद्राकडून सांगण्यात आलं आहे.

याबाबत बोलताना देशाचे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन म्हणाले की, सीरम इन्स्टिट्यूटने विकसित केलेल्या ‘कोविशील्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोवॅक्सिन’ या दोन्ही लसींना सरकारने आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली. दोन्ही लसींचे 1.65 कोटी डोस सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना डेटाबेसमध्ये असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार वितरित केले आहेत. कोविड-19 महामारी, लसीकरण आणि CoWin अॅप संदर्भात प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी कॉल सेंटर्सचीही स्थापना करण्यात आली आहे.