शरद पवारांचे जवळचे मित्र काँग्रेस नेते अ‍ॅड. साळवे यांचे निधन
बातमी महाराष्ट्र

शरद पवारांचे जवळचे मित्र काँग्रेस नेते अ‍ॅड. साळवे यांचे निधन

मुंबई : पुरोगामी चळवळीचे अग्रणी योध्दा, फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचे निष्ठावान प्रचारक, सत्य शोधक समाजाचे प्रखर कार्यकर्ता, लेखक, विचारवंत काँग्रेसचे माजी आमदार अ‍ॅड. एकनाथराव साळवे यांचे आज (ता. १३) दुपारी १.२० वाजता निधन झाले. ते ९१ वर्षाचे होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मूळचे बामणी येथील रहिवासी असलेले साळवे मागील अनेक वर्षापासून सिव्हील लाईन प्रभागात मुलगा अ‍ॅड. जयंत साळवे व कुटूंबियांसोबत वास्तव्याला होते. वृध्दापकाळाने त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात पत्नी शालिनी, एक मुलगा, ३ मुली, सून, नातू, जावई व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांचे पार्थिवावर रविवार १४ मार्च रोजी बामणी येथे सकाळी ११ वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

लेखक असल्यामुळे साहित्यिक, कवींच्या वर्तुळातही एकनाथराव यांची बैठक होती. एन्काऊंटर, मी बौध्द धम्म का स्विकारला या शिवाय इतर पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे. वकीली व्यवसाय करतांना अनेक दिनदुबळे, दलित, आदिवासी, गरीबांना त्यांनी न्याय मिळवून दिला. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, पालकमंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुभाष धोटे, माजी खासदार नरेश पुगलिया, माजी मंत्री हंसराज अहीर यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. गोडसेंच्या घरात गांधी विचार पोहचविण्याची त्यांची शेवटी इच्छा होती.