देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतोय; मागील २२ दिवासांतील सर्वात मोठी वाढ
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतोय; मागील २२ दिवासांतील सर्वात मोठी वाढ

नवी दिल्ली : देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. यात महाराष्ट्र, केरळ, पंजाब, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड यासारखी राज्य आघाडीवर आहेत. देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. मात्र, अशातच रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढून लागल्यानं चिंतेत वाढ झाली आहे. मागील २२ दिवसांतील सर्वात मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शनिवारी देशात 13 हजार 993 म्हणजेच जवळपास 14 हजार रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. या आधी 29 जानेवारीला 18 हजार 855 रुग्ण आढळून आले होते. यानंतर शनिवारची रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. देशात सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात आढळून येत आहे. शनिवारी राज्यात 6 हजार 281 नवे रुग्ण आढळले आहेत. मागील दहा दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत दुपटीनं वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसार रोखण्यासाठी मुंबईत आतापर्यंत तेराशेपेक्षा अधिक इमारती सील केल्या आहेत. 5 रुग्ण आढळल्यास संबंधित इमारत सील करण्याचे आदेश मुंबई महापालिकेने दिले आहेत. कोरोनाबाधित रुग्ण आणि संशयित होम क्वारंटाईनमध्ये असतानाही बाहेर वावरताना आढळून आल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये आढळणारी रुग्णसंख्या पाहाता केंद्रानंही चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे कोरोनाची ही साखळी खंडित करायची असल्यास नियमांचं काटेकोर पालन गरजेचं असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. मुंबईत 1 फेब्रुवारीपासून लोकलचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले केले गेले आहेत. मात्र, याठिकाणी सुरक्षा निर्बंधांच्या अंमलबजावणीत हलगर्जीपणा होत असल्यानं रुग्ण वाढ झपाट्यानं होत असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे.

देशामध्ये सध्या १०९७७३८७ कोरोना रुग्ण असून त्यातील १०६७८०४८ जण बरे झाले आहेत. शनिवारी कोरोनामुळे १०१ जण मरण पावले आहेत. देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या १४३१२७ आहे. देशातील कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या दीड लाखापेक्षा कमी असून त्यांचे प्रमाण १.२७ टक्के आहे. या आजारातून १ कोटी ६ लाख ७८ हजार जण बरे झाले असून, त्यांचे प्रमाण ९७.२७ टक्के आहे.