सचिन वझें’चा  मोठा खुलासा; ती कार मीच चालवत होतो
बातमी महाराष्ट्र

सचिन वझें’चा मोठा खुलासा; ती कार मीच चालवत होतो

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडल्या प्रकरणी आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने एक इनोव्हा गाडी जप्त केली आहे. ती इनोव्हा गाडी आपणच चालवत होतो, अशी कबुली याप्रकरणातील आरोपी सचिन वाझे यांनी दिली आहे. अँटिलियाच्या बाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या ठेवल्या कुणी? या प्रश्नाचं उत्तर अद्याप सापडलेलं नाही. मात्र, अँटिलियाबाहेरच्या सीसीटीव्हीमध्ये दिसणारी व्यक्ती सचिन वाझेच असल्याचं NIA नं आता स्पष्ट केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

25 फेब्रुवारी ला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडली होती. त्यानंतर घटनास्थळावर आणखी एक इनोव्हा गाडी आढळून आली होती. ही पांढऱ्या रंगाची इनोव्हा गाडी सचिन वाझे हेच चालवत होते, अशी माहिती एनआयएच्या सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच, स्कॉर्पिओ आणि पांढरी गाडी चालवणारे दुसरे तिसरे कोणी नसून CIU चे पोलीस होते.

अखेर या प्रकरणी एनआयएच्या पथकाने चौकशी केली असता सचिन वाझे यांनी आपणच ती गाडी चालवत होतो, अशी कबुली दिली आहे. याचबरोबर, स्कॉर्पिओ गाडी उभी करून पांढऱ्या गाडीतून सचिन वाझे आणि आणखी दोन CIU चे अधिकारी बसून मुलूंड टोल नाक्यावरुन ठाण्याला गेले होते. पांढऱ्या रंगाची इनोव्हा आणि स्कॉर्पिओ गाडी ठाणे येथेच पार्क केली होती, अशीही माहिती समोर आली आहे. याबाबतचे वृत्त न्यूज-१८ लोकमतने दिले आहे.

दरम्यान, या प्रकरणाशी संबंध असलेली स्कॉर्पियो आणि इनोव्हा गोडी जप्त केल्यानंतर एनआयएने मंगळवारी एक मर्सिडीज बेन्झ (Mercedes Benz) गाडीही जप्त केली आहे. सचिन वाझे यांच्याकडून मिळालेल्या माहितीतून एनआयएच्या पथकाने काळ्या रंगाची मर्सिडीज (एमएच १८-बी आर-९०९५) जप्त केली. गाडीच्या डिक्कीमध्ये एका पिशवीत चेक्सचा शर्ट, पाच लाखांची रोकड, नोटा मोजणारे मशीन, नंबरप्लेट व डायरी सापडली आहे. ही गाडी वाझे वापरीत होते, त्याचप्रमाणे जी नंबरप्लेट आहे, ती स्कॉर्पिओला वापरण्यात आली होती. पीपीई किट वापरणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर असाच लाल रंगाचा चेक्स शर्ट असल्याचे फुटेजमधून स्पष्ट दिसत होते.

या प्रकरणाचा तपास करताना सचिन वाझे यांच्याकडून ‘एनआयए’च्या पथकाने एक मर्सिडीज जप्त केली आहे. मात्र, या गाडीसोबत भाजप (BJP Leader) नेत्याचे संबंध असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin sawant) यांनी केला आहे. मनसुख हिरेन यांची हत्या झाली, त्या दिवशी याच गाडीतून त्यांनी प्रवास केला होता. आता याबद्दल भाजप नेत्यांनी खुलासा करावा, अशी मागणीही सचिन सावंत यांनी केली.

एएनआयनं यासंदर्भात माहिती दिली असून सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीने PPE किट घातलेलं नसून साधा कुर्ता-पायजमा घातला असल्याचं देखील एनआयएनं सांगितलं आहे. या प्रकरणी अँटिलियाबाहेर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्यांच्या प्रकरणाचा तपास एनआयए करत असून मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एटीएस करत आहे. मुंबई सीआययूचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा या प्रकरणात असलेला कथित सहभाग सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.