महाराष्ट्रातील या विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर
बातमी मराठवाडा

महाराष्ट्रातील या विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर

नांदेड : देशभरातील एकूण ३३ मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या नांदेडमधील देगलूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीचाही समावेश आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पुढील महिन्यात ३० ऑक्टोबर रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार असून २ नोव्हेंबर रोजी मतमोजणी असेल. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनामुळे निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्या जागेसाठी मतदान जाहीर झाल्यामुळे आता राजकीय पक्षांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या माहितीप्रमाणे, या निवडणुकीसाठी ८ ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. ११ ऑक्टोबरपर्यंत अर्जांची छाननी केली जाणार असून १३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. यानंतर १७ दिवसांनी म्हणजेच ३० ऑक्टोबर रोजी मतदान होईल, तर २ नोव्हेंबर रोजी मतमोजणी केली जाईल.

नांदेडच्या देगलूर विधानसभा मतदारसंघात २००९च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर निवडून आले होते. पण २०१४ च्या निवडणुकीत इथल्या मतदारांनी शिवसेनेच्या पारड्यात आपलं मत टाकलं. तिथे सुभाष साबणे आमदार म्हणून निवडून आले. २०१९मध्ये काँग्रेसनं हा मतदारसंघ पुन्हा जिंकत रावसाहेब अंतापूरकर आमदार झाले. मात्र, त्यांच्या निधनानंतर तिथे पुन्हा निवडणुका लागल्या आहेत.