मोठी बातमी! पूरग्रस्त भागात वीजबिल वसुली न करण्याचा सरकारचा आदेश
बातमी महाराष्ट्र

मोठी बातमी! पूरग्रस्त भागात वीजबिल वसुली न करण्याचा सरकारचा आदेश

मुंबई : मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रासाह कोकणातही पुराचा फटका बसला आहे. मुख्यमंत्री उद्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा केला असून परिस्थितीची पाहणी केली आहे. पूरग्रस्तांसाठी अद्याप कोणतीही मदत जाहीर करण्यात आलेली नसून लवकरच ती जाहीर केली जाईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान पुराचा फटका बसलेल्या नागरिकांना ठाकरे सरकारने दिलासा दिला असून वीजवसुली न करण्याचे आदेश दिले आहेत. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ही माहिती दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आम्ही पूरग्रस्त भागात वीजवसुली करु नये असे आदेश दिले आहेत. या ठिकाणी वसुली होणार नाही. परिस्थिती पूर्ववत होत नाही तोवर वीजबिलंदेखील दिली जाणार नाहीत. लोकांचं खूप मोठं नुकसान झालं आहे. परिस्थिती निवळल्यानंतर वीज बिल देत असतानाही कितपत दिलासा देऊ शकतो याचा विचार समिती करत आहे. दरम्यान नितीन राऊत यांनी यावेळी वीजबिल माफ करण्यासंबंधंचा निर्णय मंत्रिमंडळाकडे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांसाठी सरकराने भरीव मदतीचं पॅकेज जाहीर करावं, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर बोलताना मी पॅकेज घोषित करणारा मुख्यमंत्री नसून मदत करणारा मुख्यमंत्री आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.