१०वी आणि १२वीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात मोठा बदल!
बातमी महाराष्ट्र

१०वी आणि १२वीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात मोठा बदल!

मुंबई : देशात आणि राज्यात गेल्या काही दिवासांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यासोबतच मृतांचा आकडा देखील राज्यात वाढला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एमपीएससीची ११ एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलल्यानंतर दहावी आणि बारावीच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीटरवर यासंदर्भात माहिती देणारा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दहावी आणि बारावीच्या परीक्षा नेमक्या किती तारखेला घेणार, याविषयी राज्य सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. मात्र, दहावीच्या परीक्षा जून महिन्यात तर बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होतील. त्याअनुषंगाने नियोजन करून परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या जातील, असं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.

मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दहावी आणि बारावी हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनातला महत्त्वाचा टप्पा आहे. आधीच अभ्यासाचा तणाव आणि त्यात रुग्णांची वाढणारी संख्या, हा चिंतेचा विषय होता. या परिस्थितीत परीक्षा कशी द्यायची, हा मोठा प्रश्न होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा घेऊन निर्णय घेण्यात आला आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचं आरोग्य ही आमच्यासाठी प्राथमिकता आहे, असं देखील वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.