मनसुख हिरेन यांचा मृतदेह काढलेल्या प्रत्यक्षदर्शीने सांगितली धक्कदायक माहिती
बातमी मुंबई

मनसुख हिरेन यांचा मृतदेह काढलेल्या प्रत्यक्षदर्शीने सांगितली धक्कदायक माहिती

ठाणे : देशातील प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडी प्रकरणाने चांगलीच खळबळ माजली आहे. या प्रकरणात दररोज काहीना काही महत्त्वाची माहिती समोर येत आहे. गाडीमालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह संशयितरित्या आढळून आल्यानंतर तर या प्रकरणात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, हिरेन यांचा मृतदेह पहिल्यांदा पाहिलेल्या प्रत्यक्षदर्शींनी पुन्हा एक मोठा खुलासा केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मुंब्रा रेतीबंदर खाडीच्या बाजूला रेल्वे ब्रिजचे काम चालू आहे. या ब्रिजच्या कामावरील सुपरवायझर वाघमारे हे किनाऱ्यावर लघुशंका करण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांना प्रथम मनसुख हिरेन यांचा मृतदेह चिखलात पालथ्या अवस्थेत पडलेला दिसला. मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीच्या किनारी चिखलात फसलेल्या अवस्थेत होता. त्यांच्या तोंडात सहा ते सात रुमाल कोंबले होते, अशी माहिती वाघमारे आणि पंडित यांनी एका वृत्तवाहिनीला दिली.

त्यानंतर त्यांनी वाघमारेंनी लगेच 100 नंबरला फोन लावून पोलिसांना ही माहिती दिली. पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत मृतदेह काढण्याची प्रक्रिया सुरु केली. पण मृतदेह चिखलात अडकलेला असल्यामुळे बाहेर काढणे शक्य होत नव्हते. शेवटी क्रेनच्या सहाय्याने त्यांचा मृतदेह कपड्यात बांधून पुन्हा दोरीने बांधून क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आला, अशी माहिती वाघमारेंनी दिली.

वाघमारे म्हणाले की, ”मृतदेह काढण्यासाठी आतमध्ये चिखलात भगवान पंडित नावाचा तरुण गेला होता, त्याने स्वतः मृतदेह बांधून बाहेर काढण्यास मदत केली आहे. मृतदेह काढल्यानंतर मनसुख हिरेन यांच्या तोंडावर मास्क होता, आणि मास्कच्या आतमध्ये 6 ते 7 रुमाल असल्याचे सांगितले. मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मृतदेहाजवळ सुसाईड नोट, किंवा त्यांचा मोबाईल नव्हते, असेही त्यांनी सांगितले आहे.