हिरेन यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांचा नकार; मृत्यूची उच्चस्तरीय चौकशीची मागणी
बातमी महाराष्ट्र

हिरेन यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांचा नकार; मृत्यूची उच्चस्तरीय चौकशीची मागणी

ठाणे : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचं गुढ आणखी वाढत चाललं आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांनी नकार दिला असून या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. तर पोलीस त्यांच्या कुटुंबियांना मृतदेह ताब्यात घेण्यासाठी विनंती करत आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, हिरेन यांचा शवविच्छेदन अहवाल आल्यानं त्यांचे कुटुंबीय मृतदेह ताब्यात घेतील. असं पोलिसांनी सांगितलं होतं. त्यानुसार, ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मनसुख हिरेन यांचं शवविच्छेदन करण्यात आलं. त्याचा अहवाल ठाणे पोलिसांना मिळाला आहे. हिरेन यांचा बुडून मृत्यू झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे, असं वृत्त ‘एबीपी माझा’नं दिलं आहे. तसेच, हिरेन यांचा व्हिसेरा पुढील तपासासाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात येणार आहे.

मनसुख हिरेन यांच्या शवविच्छेदन अहवालानंतर ठाणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष देवीलाल जैन यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, ते समाजाचे चांगले कार्यकर्ते होते, त्यांना कोणतंही व्यसन नव्हतं, मनसुख हिरेन यांच्या कुटुंबीयांना जी काही मदत लागेल ती आम्ही सर्व करणार असल्याचं त्यांनी सांगितले.

तर हिरेन यांच्या पत्नी विमल हिरेन यांनी देखील या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. माझे पती आत्महत्या करूच शकत नाही, ते पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करत होते, गेल्या ८ दिवसांपासून त्यांना अनेकदा चौकशीसाठी बोलावलं, काल सुद्धा पोलिसांनी हिरण यांना बोलावलं. कांदिवली क्राईम ब्रँचचे तावडे नावाच्या पोलिसाचा फोन आला. त्या पोलिसाने घोडबंदर येथे भेटायला बोलावले. मनसुख तिकडे गेले त्यानंतर रात्री १० वाजल्यानंतर मनसुख हिरेन यांचा फोन बंद झाला. मात्र आज बातमी कळली की, त्यांचा मृतदेह मुंब्रा येथे सापडला. पोलिसांकड़ून जेव्हा जेव्हा त्यांना बोलावले तेव्हा त्यांच्याकड़ून सहकार्य करण्यात येत होते. त्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त चुकीचे आहे. कारण ते कधीच तणावात नव्हते. आयुष्यात असाही दिवस येईल असं स्वप्नात देखील वाटले नव्हते. ” असे हिरेन यांनी म्हंटल आहे.