शेतकरी मोर्चा आज राजभवनाकडे; तर मुख्यमंत्र्यांनी मोर्च्यात सहभागी न होण्याचा राष्ट्रवादीचा सल्ला
बातमी मुंबई

शेतकरी मोर्चा आज राजभवनाकडे; तर मुख्यमंत्र्यांनी मोर्च्यात सहभागी न होण्याचा राष्ट्रवादीचा सल्ला

मुंबई : किसान सभेच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी आंदोलनाची घोषणा झाली आहे. या पार्श्वभूमीवर किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा आझाद मैदान येथे दाखल झाला. आज हा मोर्चा राजभवनाच्या दिशेने निघणार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी शेतकरी आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यापूर्वीच आंदोलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मिळालेल्या माहितीनुसार, किसान सभेच्या नेतृत्वाखाली रविवारी सकाळी शेतकऱ्यांचा जथा इगतपुरी तालुक्यातील घाटनदेवी येथून मुंबईसाठी निघाला. अडीच तास चालून कसाऱ्याजवळ त्यांनी पुन्हा गाड्यांमध्ये बसून आपली आगेकूच सुरू केली. महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने नाशिकहून मुंबईकडे लाँग मार्चसाठी आलेल्या शेतकऱ्यांचा गट शनिवारी सायंकाळी ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर घाट्नदेवी येथे मुक्कामी होता.

यातील, १५ हजार शेतकरी कसारा घाट पायी उतरले. त्यानंतर वाहनांतून निघालेल्या आंदोलकांचे कल्याण फाटा, ठाणे शहर व मुंबई शहरात जनतेकडून उत्स्फूर्त स्वागत झाल्याचे किसान सभेच्या नेत्यांनी सांगितले. रविवारी २० हजार कष्टकरी सकाळी साडेआठ वाजता घाट्नदेवी ते कसारा घाटमार्गे लतीफवाडी हे १२ किलोमीटरचे अंतर पायी येत शहापूर तालुक्यात दाखल झाले. तर आज विविध वाहनांतून हजारो शेतकरी मुंबईत दाखल झाले असून, सोमवारी जाहीर सभेने शेतकऱ्यांचा मोर्चा राजभवनाच्या दिशेने निघणार आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोर्चात सहभागी होऊ नये, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. उद्धव ठाकरे घटनात्मक पदावर आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात मोर्चा काढणं संयुक्तिक ठरत नाही. त्यामुळे त्यांनी मोर्चात सहभागी होऊ नये, असा सल्ला राष्ट्रवादीने दिला आहे. परिणामी मुख्यमंत्री या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता मावळली आहे.

तर इगतपुरी, शहापूर तालुक्यांच्या अनेक करखान्यांसमोर सीटूच्या कामगारांनी शेतकरी जथ्याचे स्वागत केले. कल्याण फाट्यावर आणि ठाणे शहरात विविध डाव्या संघटना, संस्थांसोबतच शिवसेना नेत्यांनी आंदोलकांचे स्वागत केले. रविवारी सायंकाळी वाहने आझाद मैदानाजवळ पोहोचली. येथे संयुक्त शेतकरी कामगार मोर्चातर्फे सुरू झालेल्या महामुक्काम आंदोलनात ते सामील झाले. सोमवारी सकाळी ११ ते २ या वेळेत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

यानंतर शेतकऱ्यांचा मोर्चा राजभवनाकडे निघणार आहे. तिन्ही कृषी कायदे आणि चारही श्रम संहिता रद्द करा, वीज विधेयक मागे घ्या आणि शेतकऱ्यांसाठी रास्त हमी भावाचा कायदा करा, या मुख्य मागण्या केल्या जाणार आहेत. तर २६ जानेवारी, प्रजासत्ताकदिनी राष्ट्रीय ध्वजाचे वंदन आणि राष्ट्रगीत गाऊन तसेच शेतकरी-कामगारांचा लढा कोणत्याही परिस्थितीत विजयी करण्याच्या निर्धारासह कार्यक्रमाची सांगता होईल, असे किसान सभेने स्पष्ट केले.

या मोर्चात अखिल भारतीय किसान सभा, सीटू कामगार संघटना, अखिल भारतीय शेतमजूर युनियन, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, डीवायएफआय ही युवक संघटना व एसएफआय ही विद्यार्थी संघटना, शेतकरी, कामगार, शेतमजूर, महिला, युवक व विद्यार्थी सहभागी झाले आहेत.