स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच एका महिला आरोपीला होणार फाशी…
देश बातमी

स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच एका महिला आरोपीला होणार फाशी…

उत्तरप्रदेश : स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच एका महिला गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. शबनम असं महिला गुन्हेगाराचं नाव असून उत्तरप्रदेशामधल्या मथुरा इथल्या तुरूंगात तिला फाशी दिली जाणार आहे. तारिख मात्र अद्याप निश्चित झालेली नाही. अमरोहा कोर्टाने दिलेल्या निर्णयाला शबनमने सुप्रीम कोर्टात देखील आव्हान दिले होते. सुप्रीम कोर्टानेही कोर्टाचा निर्णय कायम ठेवला होता.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शबनमने आपला प्रियकर सलीमच्या मदतीने 15 एप्रिल 2008 रोजी आपल्या कुटुंबातील सात जणांची निर्घृण हत्या केली होती. यामध्ये तिच्या आईवडील, दोन भाऊ, वहिनी, मावशीची मुलगी आणि पुतण्याचा समावेश होता. या प्रकरणी शबनम आणि सलीमने राष्ट्रपतींकडे दयेची याचिका केली होती. या प्रकरणात अमरोहा कोर्टात दोन वर्षे तीन महिने सुनावणी सुरू होती. त्यानंतर १५ जुलै २०१० रोजी कोर्टाने शबनम आणि सलीमला फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, राष्ट्रपतींनीही दया याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या महिला आरोपीला फाशी होणार आहे.

शबनचे गाव बावनखेडी आहे. बावनखेडी गावचे सरपंच मोहम्मद नबी म्हणाले, 2008 साली झालेल्या हत्येनंतर आम्ही हादरून गेलो होतो. त्यावेळी गावातील अनेक मुलींचे नाव शबनम होते. त्यातील अनेक मुलींचे लग्न झाले आहे. 2008 सालानंतर गावातील एकाही व्यक्तीने आपल्या मुलीचे नाव शबनम ठेवले नाही. शबनमला लवकरात लवकर फाशी दिली पाहिजे, अशी गावकऱ्यांची भावना आहे.

महिलांना फाशी देण्यासाठी उत्तर प्रदेशातील हे एकमेव तुरुंग आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर या तुरुंगात एकाही महिला कैद्याला फाशीची शिक्षा दिलेली नाही. मथुरा तुरुंगात १८७० मध्ये फाशीघर तयार करण्यात आले होते. मात्र, तुरुंगातील नोंदीनुसार, देश स्वतंत्र झाल्यानंतर या फाशीघरात एकाही कैद्याला फाशी देण्यात आलेली नाही. मथुरा तुरुंगातील या फाशीघराच्या दुरुस्तीचे काम आता सुरू झाले आहे.