आता अभ्यासाला लागा! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा मार्चमध्ये होणार
बातमी महाराष्ट्र

आता अभ्यासाला लागा! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा मार्चमध्ये होणार

मुंबई : कोरोना महामारीमुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे वर्षभरापासून रखडलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा मार्चमध्ये होणार आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे उमेदवार या परीक्षांची वाट पाहत होते. अनलॉक अंतर्गत सर्व व्यवहार सुरळीत होत असताना एमपीएससीच्या परीक्षादेखील लवकरात लवकर घेण्यात याव्यात, अशी मागणी या उमेदवार करत होते. त्याची दखल घेत, आता एमपाएससीची परीक्षा लवकरच घेतली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षांबद्दल अंतिम निर्णय घेतला असून परीक्षांच्या तारखेबाबत आज (8 जानेवारी) अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यसेवा पूर्व परिक्षा तर तिसऱ्या आठवड्यात अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. तर दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा याच वर्षी एप्रिल महिन्यात होणार आहे. या सर्व परीक्षांची अधिकृत घोषणा राज्य सरकारतर्फे आज ( शुक्रवार 8 जानेवारी) होण्याची शक्यता आहे.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानंतर ठाकरे सरकारनं MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला होता. सामाजिक व आर्थिकदृष्टय़ा मागास (एसईबीसी) आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर राज्य शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा पुढे ढकलल्या. राज्यसेवा पूर्व परीक्षा, दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व, अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये घेण्यात येणार होत्या.

मात्र, एसईबीसी आरक्षणाला अंतरिम स्थगिती मिळाल्यानंतर संघटनांकडून परीक्षा घेण्यास विरोध दर्शवण्यात आला. मात्र आता सामाजिक व आर्थिकदृष्टय़ा मागास प्रवर्गातून(एसईबीसी) अर्ज केल्यास उमेदवारांना खुल्या किंवा आर्थिकदृष्टय़ा मागास (ईडब्लूएस) प्रवर्ग निवडण्याची संधी आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. यामुळे परीक्षा घेण्याचा तिढा सुटला असून तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. दरम्यान त्यावेळी परीक्षा पुढे ढकलल्यामुळे कोणताही विद्यार्थी अपात्र ठरणार नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. MPSC च्या परीक्षेची पुढची तारीख लवकरच जाहीर करू, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. त्यांनतर आता आज परीक्षेची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.