स्मिथच्या शतकी पारीच्या जोरावर कांगारुंची पहिल्या डावात त्रिशतकी मजल
क्रीडा

स्मिथच्या शतकी पारीच्या जोरावर कांगारुंची पहिल्या डावात त्रिशतकी मजल

सिडनी : स्टिव्ह स्मिथची शतकी खेळी आणि लाबुशनच्या ९१ धावांच्या खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियानं तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ३३८ धावांपर्यंत मजल मारली. पदार्पण करणाऱ्या पुलोव्हस्कीनं संयमी ६२ धावांची खेळी केली. रविंद्र जाडेजा-बुमराह यांच्या भेदक माऱ्यापुढे दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची फलंदाजी ढासळली. स्मिथच्या १३० धावांच्या शतकी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात ३३८ धावा केल्या आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

३३८ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली असून रोहित शर्मा आणि शुभमन गिलने डावाची सुरुवात केली आहे. धावफलकावर भारताच्या बिनबाद ५० धावा लागल्या आहेत. दुसऱ्या दिवशी जाडेजानं लाबुशेन स्मिथची जोडी फोडत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडलं. लाबुशेन बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. स्मिथ एका बाजूनं किल्ला लढवत असताना दुसऱ्या बाजूनं विकेट पडत गेल्या. ग्रीन, मॅथ्यू वेड आणि पेन यांना आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. लाबुशेन-पुलोव्हस्की आणि स्मिथ-लाबुशेन यांची अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या विकेटसाठी १०० धावांची भागिदारी केली. या व्यतिरिक्त भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाचा डाव कोसळला.

भारताकडून रविंद्र जाडेजानं प्रभावी मारा करताना चार महत्वाच्या विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि पदार्पण करणाऱ्या नवदीप सैनी यांनी प्रत्येकी दोन-दोन बळी घेतले. सिराजला एक विकेट मिळाली. दरम्यान, जवळपास दीड वर्षानंतर स्मिथनं कसोटीत शतक झळाकवलं आहे. याआधी सप्टेंबर २०१९ मध्ये इंग्लंडविरोधात २११ धावांची खेळी केली होती. त्यानंतर स्मिथला एकही शतकी खेळी करता आली नव्हती.