मराठी गझलकार इलाही जमादार यांचं निधन
बातमी महाराष्ट्र

मराठी गझलकार इलाही जमादार यांचं निधन

मुंबई : मराठी गझलेला शिखरावर नेणारे प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. आत्म्याचा सौदा करूनी जर स्वतःस विकले असते, एकेक वीट सोन्याची घर असे बांधले असते, असं म्हणत मानवी जीवनातील दुःख, वेदना शब्दबद्ध करणारे आणि आपल्या लेखणीनं मराठीतील गझलविश्व समृद्ध करणारा गझलकार आज काळाच्या पडद्याआड गेला. कविवर्य सुरेश भट यांच्यानंतर इलाही जमादार यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाई.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जमादार यांचा जन्म १ मार्च १९४६ रोजी झाला सांगलीतील दुधगाव येथे झाला होता. जमादार यांनी १९६४ पासून काव्यलेखन सुरू केलं. आकाशवाणी आणि दूरदर्शनवर त्यांनी कार्यक्रम केले. मराठी, हिंदी, उर्दू आदी दैनिकं आणि मासिकांसाठी इलाही जमादार यांनी कविता व गझल लिहिल्या.

नवोदित कवींसाठी इलाही गझल क्लिनिक नावाची गझल कार्यशाळाही घ्यायचे. सुरेश भट यांच्यानंतर इलाहींनी मराठी गझलेला उत्तुंगतेच्या शिखरावर नेलं. जुलै २०२० मध्ये ते तोल जाऊन पडले होते. यावेळी त्यांना जबर मार लागला होता. त्यातच वाढत्या वयामुळे त्यांना स्मृतिभ्रंशाचा त्रासही सुरू झाला होता.