पुलवामात दहशतवाद्यांचा सुरक्षा दलावर ग्रेनेड हल्ला; आठजण गंभीर जखमी
देश बातमी

पुलवामात दहशतवाद्यांचा सुरक्षा दलावर ग्रेनेड हल्ला; आठजण गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील त्राल येथील बस स्थानकात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर ग्रेनेड हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात आठ नागरिक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसात दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांचा नेम चुकला आणि तो बस स्थानकातील नागरिकांच्या जवळ पडला. त्यामुळे नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. तथापि, या जखमी नागरिकांची स्थिती स्थिर असून जवळच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी हल्ल्यानंतर तातडीने संपूर्ण परिसर सील करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमधील श्रीनगरपासून काही अंतरावर दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले होते. 25 डिसेंबर 2020 रोजी दहशवादी आणि सुरक्षादलांमध्ये काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील कैगाम भागात जोरदार चकमक झाली होती. भारतीय सीमेत घुसखोरी केलेल्या तीन दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार करण्यास सुरुवात केली होती. दहशतवाद्यांच्या हल्ल्याला भारतीय सुरक्षादलांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला आणि भारतीय सैन्यातील दोन जवान जखमी झाले होते.

तथापि, काश्मीर खोऱ्यात गेल्या तीन दिवसात हा तिसरा ग्रेनेड हल्ला आहे. गेल्या शुक्रवारी संध्याकाळी श्रीनगरच्या बायपास परिसरातील चनपोरा येथील एसएसबी कॅम्पजवळ दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात कोणतेही नुकसान झाले नाही. अधिकाऱ्यांचा म्हणण्यानुसार दहशतवाद्यांनी एसएसबीच्या 14 बटालियन कॅम्पवरील ग्रेनेड कॅम्पवर हल्ला केला. ग्रेनेड हल्ल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलाने त्या भागाची घेराव घेताना शोध मोहीम राबविली पण कोणताही हल्लेखोर सापडला नाही.

त्याआधी एक दिवस, शेवटच्या गुरुवारी जिल्हा अनंतनागच्या संगम भागात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या 90 बटालियन गस्तीवर निशाणा साधत यूबीजीएल ग्रेनेडने हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफ जवान जखमी झाला. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जेथे आता त्यांची प्रकृती अधिक चांगली सांगण्यात येत आहे.

काश्मीर खोऱ्यातील अतिरेक्यांवर सुरक्षा दलांच्या कडक कारवायांमुळे तेथील दहशतवादी चवताळले आहेत. म्हणूनच त्यांनी सुरक्षा दलांना लक्ष्य करुन त्यांच्यावरील हल्ले वाढले ​​आहेत. या हल्ल्यांदरम्यान सामान्य लोकांच्या उपस्थितीचीही पर्वा करू नये, अशा स्पष्ट सूचना पाकिस्तानमधील त्याच्या म्होरक्यानी दिल्या आहेत. हेच कारण आहे की दहशतवादी हल्ल्यांमध्ये सामान्य लोकांना देखील लक्ष्य केले जात आहे.