हिंदू महासभेने सुरु केली नथुराम गोडसेंच्या नावाने ज्ञानशाळा; देशात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता
देश बातमी

हिंदू महासभेने सुरु केली नथुराम गोडसेंच्या नावाने ज्ञानशाळा; देशात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

मध्यप्रदेश : हिंदू महासभेकडून ग्वाल्हेरमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे यांच्या नावाने गोडसे ज्ञानशाळा सुरू करण्यात आली आहे. याद्वारे युवकांपर्यंत नथुराम गोडसेचे विचार पोहचवले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, रविवार(१० जानेवारी) ही शाळा सुरू करण्यात आली तेव्हा नथुराम गोडसेचा जयजयकार देखील हिंदू महासभेकडून करण्यात आला. या शाळेमुळे आता देशात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मिळालेल्या माहितीनुसार, ग्वाल्हेरच्या दौलतगंज येथील हिंदू महासभेच्या कार्यालयात गोडेसे कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे. शाळेच्या उदघाटन प्रसंगी नथुराम गोडसे यांच्या छायाचित्रासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार आणि श्यामा प्रसाद मुखर्जी आणि इतर अनेक महापुरूषांचे फोटो देखील ठेवण्यात आले होते.

गोडसे ज्ञानशाळेचे उदघाटन प्रसंगी हिंदू महासभेचे उपाध्यक्ष जयवीर भारद्वाज यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, ” आमच्या सोबत तरुणांसह अनेक महिला देखील आहेत. गुरु गोविंद सिंग, डॉ. हेडगेवार, वीर सावरकर, श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या सारख्या महापुरुषांपासून गोडसे यांनी प्रेरणा घेतली होती. आमचं असं म्हणण आहे की या देशाचे कुणीही विभाजन केलं तर हिंदू महासभा त्याला प्रखरपणे उत्तर देईल. हिंदू महासभेकडून पुन्हा एकदा नथुराम गोडसे निर्माण करण्यात येईल.”

तर दुसरीकडे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. गोविंद सिंह यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ‘जेव्हा भाजप आणि आरएसएसची सरकारे स्थापन होतात, तेव्हा महात्मा गांधींच्या मारेकऱ्यांचा गौरवच केला जातो. संपूर्ण जग ज्यांना आदर्श मानते त्या महात्मा गांधींच्या मारेकऱ्याच्या नावावर एक ज्ञान शाळा सुरू करणे म्हणजे गोडसेचा प्रचार करणे आणि हत्येला प्रोत्साहन देण्यासारखे आहे.

दरम्यान या ज्ञान शाळेच्या माध्यमातून नथुरामची गोडसेंची प्रेरणा असलेल्या थोर पुरुषांचे बलिदानाच प्रचार-प्रसार केला जाईल. या ज्ञान शाळेच्या माध्यमातून गोडसे यांच्या शेवटच्या विधानाची प्रसिद्धी केली जाणार आहे.