तर, माझं नावही संजय राऊत नाही; राऊतांचा भाजपाला इशारा
राजकारण

तर, माझं नावही संजय राऊत नाही; राऊतांचा भाजपाला इशारा

मुंबई : ‘ज्या पद्दतीने ही मंडळी अफाट, बेफाट, आरोप करत सुटले आहेत त्यातून काही निष्पन्न होणार नाही. आरोप सिद्ध झाले नाहीत तर त्यांना जोड्याने मारणार, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर गंभीर आरोप केले असून शिवसेना त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी आरोप सिद्ध झाले नाहीत तर जोड्याने मारणार असल्याचा इशाराच भाजपला दिला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एबीपी माझाशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “ज्या पद्दतीने ही मंडळी अफाट, बेफाट, तोंडफाट आरोप करत सुटले आहेत त्यातून काही निष्पन्न होणार नाही. काहीही कागदं फडकावतात आणि आरोप करतात. प्रताप सरनाईक, राज्यातील प्रमुख नेते तसंच मी आणि माझ्या कुटुंबासोबत हेच केलं. हिंमत असेल तर यांनी हे आरोप सिद्ध करुन दाखवले पाहिजेत.

अब्रुनुकसानीचे खटले वैगैरे ठीक आहे ते न्यायालयात जाईल पण आरोप सिद्ध झाले नाही तर ईडीच्या कार्यालयासमोर या आरोप करणाऱ्यांना जोड्याने मारलं नाही तर माझं नाव संजय राऊत नाही हे मी आधीच सांगितलं आहे,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

संजय राउत पुढे म्हणाले कि, “ही कायद्याच्या पलीकडची भाषा असेल, पण मला आणि पक्षाला प्रतिष्ठा महत्वाची आहे. जे कायद्याच्या पलीकडे जाऊन भाष्य करत आहेत त्यांच्याकडे कायद्याची कोणती चौकट आहे? पक्षाने आमचा या व्यक्तीशी कोणताही संबंध नाही असं सांगावं. ही माकडं उड्या मारत आहेत त्यांच्याशी संबंध नाही असं त्यांनी सांगावं,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

“राजकारण, समाजकारणात, पत्रकारितेत अनेक वर्ष काम करताना आम्ही खूप काळजीपूर्वक काम केलं. तुमच्यासारखे फडतूस लोक आमच्यावरती आरोप करत बसावेत आणि त्याबद्दल वाईट प्रसिद्धी मिळावी यासाठी राजकारण, समाजकारण आणि पत्रकारिता केली नाही,” असंही संजय राऊत यांनी सुनावलं.