नव्या रुग्णांचा आकडा ३ लाखांच्या खाली; मात्र मृत्यूचे तांडव सुरुच
कोरोना इम्पॅक्ट बातमी

नव्या रुग्णांचा आकडा ३ लाखांच्या खाली; मात्र मृत्यूचे तांडव सुरुच

नवी दिल्ली : कोरोनाची नव्या रुग्णांची होणारी नोंद काही प्रमाणात कमी झाली असली तरी देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे तांडव सुरुच असल्याचे दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोना रुग्णावाढीचा आलेख कमी झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबळींची संख्या पावणेतीन लाखांवर पोहोचली असून, गेल्या २४ तासांत चार हजारांहून अधिक मृत्यूची नोंद झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गेल्या २४ तासांत दोन लाख ८१ हजार ३८६ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, तीन लाख ७८ हजार ७४१ जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. तर देशात याच कालावधीत ४ हजार १०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील मृतांची एकूण संख्या २ लाख ७४ हजार ३९० वर पोहोचली आहे.

महाराष्ट्रातील परिस्थिती नियंत्रणात
महाराष्ट्रातील परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात असल्याचे दिसून येत असून कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. मागील २४ तासांत राज्यात ५९ हजार ३१८ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर ३४ हजार ३८९ नवीन कोरोनोबाधित आढळले आहेत. मात्र मृत्यूंचा आकडा मोठा असून २४ तासांत कोरोनामुळे ९७४ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८९.७४ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आजपर्यंत ८१ हजार ४८६ रूग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर १.५२ टक्के एवढा आहे.