भंडारा जिल्हा रुग्णालयाचे होणार तातडीने ऑडिट; दोषींना मिळणार कठोर शिक्षा
बातमी महाराष्ट्र

भंडारा जिल्हा रुग्णालयाचे होणार तातडीने ऑडिट; दोषींना मिळणार कठोर शिक्षा

मुंबई : भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशू केअर युनिटला आग लागून झालेल्या बालकांचाबाबत अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असून सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित दुर्घटेनेस दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशू केअर युनिटचे तातडीने ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्हा प्रशासनाशी आपण चर्चा केली असून रुग्णालयाची सेवा योग्य खबरदारी घेऊन पूर्ववत सुरु ठेवण्याचे तसेच अन्य बालकांवरील उपचार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असून चौकशीअंती दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. त्याचबरोबर आगीच्या कारणांचा शोध घेऊन भविष्यात अशा घटना घडणार नाही यासाठी दक्षता घेतली जाईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील या घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत.

त्याचबरोबर, येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जळीत प्रकरणातील बालकांच्या मृत्यूच्या घटनेच्या चौकशीसाठी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठित करण्यात आली असून ही समिती शासनाला तीन दिवसात अहवाल सादर करेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. बेफिकिरी दाखवणाऱ्या तसेच दोषी असणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.