भारतातील रुग्णवाढीने जगातील सर्व रेकॉर्ड काढले मोडीत; तर २१०१रुग्णांचा मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

भारतातील रुग्णवाढीने जगातील सर्व रेकॉर्ड काढले मोडीत; तर २१०१रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशात दररोज कोरोना नवीन रेकॉर्ड बनवत असल्याचं पाहायला मिळत आहे. बुधवारी तर देशात झालेल्या रुग्णावाढीने जगातील सर्व उच्चांक मोडीत काढले. 24 तासात 3 लाख 15 हजार 478 नवीन रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा प्रसार झाल्यापासून आतापर्यंत एकाच दिवसात आढळलेली ही केवळ भारतातील नाही तर जगभरातील सर्वाधिक संख्या आहे. याआधी जगात एकाच दिवशी सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळण्याचा रेकॉर्ड अमेरिकेच्या नावावर होता. अमेरिकेत 8 जानेवारी 2021 रोजी 3 लाख 07 हजार 570 कोरोना रुग्ण आढळले होते. मात्र, आता याबाबतीत भारत सर्वात पुढे आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मागील 24 तासात 2101 जणांना जीव गमावला आहे. बुधवारी 1 लाख 79 हजार 372 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख 84 हजार 672 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 1 कोटी 59 लाख 24 हजार 732 इतकी झाली आहे. देशात सध्या 22 लाख 84 हजार 209 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे एकूण बाधितांच्या संख्येपैकी 14.3 टक्के आहेत.

महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह 11 राज्यांमध्ये परिस्थिती गंभीर होत आहे. या राज्यांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 67,468 नवीन रुग्ण आढळले आहेत. जगभरात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढतच आहे. मागील सात दिवसांच्या आत जगात 55 लाख 23 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. संक्रमितांच्या संख्येत 12 टक्क्यांची वाढ झाली आहे. या आठवड्यात 80 हजार 323 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.