सुनेच्या हत्येची सुपारी देणाऱ्या सासऱ्याचीच आरोपींनी केली हत्या; पुण्यातील धक्कादायक प्रकार
पुणे बातमी

सुनेच्या हत्येची सुपारी देणाऱ्या सासऱ्याचीच आरोपींनी केली हत्या; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुणे : दुसऱ्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात माणूस स्वतःच पडतो; अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. मात्र या म्हणीचा प्रत्यय प्रत्यक्ष पुण्यात आला आहे. सुनेच्या हत्येची सुपारी दिलेल्या आरोपींनी सासऱ्याचाच खून केला. विनायक भिकाजी पानमंद असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील खेड येथे घडली आहे. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड च्या म्हाळुंगे पोलिसांनी दोन आरोपींना पिस्तुलासह अटक केली असून, इतर एकाचा शोध पोलीस घेत आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, विनायक यांचा मुलगा अजित पानमंद यांचा आधी विवाह झाला असताना अजितने दोन वर्षापूर्वी प्रेमविवाह केला. याची माहिती वडील विनायक यांना काही महिन्यांपूर्वी कळाली. त्यानंतर विनायक आणि अजित यांच्यात सतत भांडणे होऊन खटके उडायला लागले. सतत भांडण सुरू झाली. हे सर्व दुसरा विवाह केल्यामुळे होत असल्याचं विनायक यांना वाटू लागलं.

मुलाचा पहिला संसार विस्कटल्याने ते अतिशय दुखी होते. त्यामुळे त्यांनी मुलाच्या दुसऱ्या पत्नीच्या हत्येचा कट रचला. त्यासाठी त्यांनी आरोपी अविनाश बबन राठोड, मोहम्मद शहजाद इस्लाम उर्फ छोटू आणि मोहम्मद वसीम जब्बार यांना टप्याटप्याने १ लाख ३४ हजारांची सुपारी दिली. आरोपींनी गोवा आणि उत्तर प्रदेश येथून दोन पिस्तुल आणली आणि खुनाचा कट रचला. परंतु, महिलेचा खून करायचा असल्याने आरोपी घाबरले होते. त्यामुळे उशीर लागत होता.

दरम्यान, विनायक पानमंद यांनी आरोपींकडे वारंवार सुनेचा खून कधी करणार? असा तगादा लावला होता. तसेच, होत नसेल तर पैसे परत करा, असं म्हणत त्यांनी आरोपीकडे पैसेही परत मागितले होते. त्यामुळे संतापलेल्या आरोपींनी विनायक यांना खेडमधील वराळे येथे बोलावून त्यांचा गळा दाबून त्यांचा हत्या केली. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड च्या म्हाळुंगे पोलिसांनी दोन आरोपींना पिस्तुलासह अटक केली असून, इतर एकाचा शोध पोलीस घेत आहेत. अविनाश बबन राठोड आणि मोहम्मद शहजाद इस्लाम उर्फ छोटू अस अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. तर, मोहम्मद वसीम जब्बार हा फरार आहे.