प्रवासी वाहतूक करणारी जीप दरीत कोसळली; ०८ जणांचा मृत्यू
उत्तर महाराष्ट् बातमी

प्रवासी वाहतूक करणारी जीप दरीत कोसळली; ०८ जणांचा मृत्यू

नंदुरबार : जिल्हयातील तोरणमाळ भागातील सिंदी दिगर घाट या अतिदुर्गम परिसरात प्रवासी वाहतूक करणारी एक जीप दरीत कोसळून भीषण अपघात घडला. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून, १५ पेक्षा जास्त प्रवासी गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, मृतांची संख्या वाढण्याची भीती देखील व्यक्त करण्यात आली आहे. या जीपमध्ये जवळपास ३० प्रवासी होते. घटनास्थळी बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

प्रवासी वाहतूक करणारी खासगी जीप सायंकाळच्या सुमारास सिंदी दिगर घाटातील दरीत कोसळली. त्यावेळी जीपमध्ये जवळपास ३० प्रवासी होती. हा अपघात एवढा भीषण होता की, जीप दरीत कोसळल्यानंतर त्या जीपचा अक्षरशः चुराडा झाला व जीपमधील आठ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. जीपमधील काही प्रवाशांनी जीप दरीत कोसळत असताना बाहेर उड्या टाकल्या ज्यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतकार्यासाठी धाव घेतली.

दुर्घटना घडली तो भाग अतिदुर्गम असल्याने बचाव कार्यात अडथळे येत आहेत. पोलीस प्रशासन स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य राबवत आहे. तर अपघातमधील जखमींना तोरणमाळसह अन्य स्थानिक ठिकाणच्या ग्रामीण रूग्णालयात हलवले जात आहे. पोलीस अधिक्षकांसह अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.