लग्नाच्या वरातीवरच कोसळली वीज, १६ जणांचा मृत्यू
बातमी विदेश

लग्नाच्या वरातीवरच कोसळली वीज, १६ जणांचा मृत्यू

ढाका : जोरदार पाऊस पडत असताना लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाडावर वीज कोसळली आणि तब्बल १६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बांगलादेशच्या चपैनवाबगंज जिल्ह्यात घडली आहे. या दुखःद घटनेत नवरदेवही जखमी झाला आहे. नदीकाठच्या एका गावात लग्न होणार असल्याने वरातीतील लोक बोटीने निघाले होते. परंतु, पावसाचा जोर वाढल्याने आणि विजा कडाडू लागल्याने ते आश्रय घेण्यासाठी शिबगंज नावाच्या गावात उतरले होते. मात्र, ते ज्याठिकाणी थांबले होते तिथेच वीज कोसळली आणि तब्बल १६ जणांचा मृत्यू झाला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, गेल्या आठवड्यात अशाच एका घटनेत बांगलादेशमध्ये २० जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये ६ निर्वासित रोहिंग्यादेखील होते. दक्षिण आशियाई देशांमध्ये दरवर्षी वीज कोसळून शेकडो लोकांचा मृत्यू होतो. आकडेवारीनुसार, २०१६मध्ये वीज कोसळून २०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. एकट्या मे महिन्यात तब्बल ८२ जणांनी जीव गमावले होते.

जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात केवळ उत्तर प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यात ६० जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती. यावेळी जयपूरच्या आंबेर किल्ल्यावर सेल्फी घेणाऱ्या काही लोकांवर वीज पडून ११ जणांचा मृत्यू झाला होता.