या वर्षीचा अर्थसंकल्प हा भारताला आत्मनिर्भर बनवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावेल : निर्मला सीतारमण
देश बातमी

या वर्षीचा अर्थसंकल्प हा भारताला आत्मनिर्भर बनवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावेल : निर्मला सीतारमण

नवी दिल्ली : देशात सुरु असलेल्या सुधारणांचा उद्देश हा भारताला जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवणे हा आहे. या वर्षीचा अर्थसंकल्प हा भारताला आत्मनिर्भर बनवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावेल. असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान सांगितले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी बोलताना निर्मला सीतारमण म्हणाल्या की, “जगातील अनेक देशांत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप सुरु आहे. पण भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकारने यावर मात करुन सातत्याने अर्थव्यवस्थेचा विकास साधला आहे. कोरोनाचे एवढं मोठं संकटही सरकारला आपल्या सुधारणांचा कार्यक्रम राबवण्यासाठी आळा घालू शकलं नाही. अनेक तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर हा अर्थसंकल्प तयार केला आहे. त्यामुळे आत्मनिर्भर भारताचा उद्देश साध्य करण्यासाठी हा अर्थसंकल्प महत्वाची भूमिका बजावेल.” असं त्यांनी म्हंटले आहे.

निर्मला सीतारमण पुढे म्हणाल्या की, “राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात शेतकरी आणि संपत्ती निर्माण करणाऱ्या उद्योगपतींची गोष्ट केली. पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 10.75 कोटी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात 1.15 लाख कोटी रुपये हस्तांतरीत करण्यात आले आहेत. या उद्योगपतींच्या योगदानाशिवाय अर्थव्यवस्था कशी चालेल? या अर्थसंकल्पामध्ये कृषीवरील खर्चात कपात का करण्यात आली आहे असा सवाल सातत्याने विचारण्यात येतोय. पण ही गोष्ट दिशाभूल करणारी आहे.” असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान यावेळी बोलाताना सीतारमण यांनी प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसवर देखील निशाणा साधला. “स्वातंत्र्यानतर अनेक वर्षे सत्तेत राहिलेल्या पक्षाने 1991 साली आर्थिक सुधारणांचा विचार केला. आणि आता तेच या सरकारला सुधारणांच्या मुद्द्यावरुन सातत्याने प्रश्न विचारतात.

तर, ”आम्हाला क्रोनी कॅपिटालिस्ट म्हणतात? शशी थरूर इथे उपस्थित आहेत. जेव्हा केरळमध्ये यांचं सरकार होतं, तेव्हा यांनी एका भांडवलदाराला बोलवलं होतं. कोणतीही निविदा नाही. आमचा क्रोनी सर्वसामान्य माणूस आहे. ज्यांना घर मिळतं. स्वनिधी योजनेचा फायदा मिळतो,” असं म्हणत अर्थमंत्र्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र डागलं. तसेच, पंतप्रधान स्वनिधी योजनेमुळे गरिबांना फायदा झाला आहे. मागास आणि मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या समूहांना फायदा झाला आहे. आम्ही यांच्यासाठी काम करतो, जावयासाठी नाही. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.