लोन ॲपवरून वसुलीसाठी बदनामी, मालकाच्या मुलीचे मॉर्फिंग केलेले अश्लिल फोटो व्हायरल
बातमी मुंबई

लोन ॲपवरून वसुलीसाठी बदनामी, मालकाच्या मुलीचे मॉर्फिंग केलेले अश्लिल फोटो व्हायरल

मुंबई पोलिस आणि केंद्रीय गृहमंत्रालयाने अनेक बेकायदा ॲप हटवल्यानंतर लोन ॲपवरून बदनामी करण्याचे प्रकार काही प्रमाणात थांबले होते. मात्र पुन्हा एकदा मालाडच्या कुरारमधून असाच प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने कर्ज फेडले असतानाही पुन्हा एकदा पैशासाठी तगादा लावण्यात आला. त्याने पैसे देण्यास नकार दिला म्हणून या तरुणाचे आणि तो नोकरी करीत असलेल्या मालकाच्या मुलीचे फोटो मॉर्फिंग करून व्हायरल करण्यात आले. या प्रकरणात कुरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मालाडमधील एका ग्राफिक्स डिझायनर ने पैशाची गरज असल्याने त्याने एक लोन ॲप डाउनलोड केले. त्याने या ॲपवरून १८ हजार रुपये कर्ज घेतले आणि मुदतीमध्ये हे कर्ज फेड केले. कोणत्याही कटकटीविना कर्ज मिळत असल्याने या तरुणाचा ॲपवर विश्वास बसला. त्याने पुन्हा एकदा याच ॲपच्या माध्यमातून कर्ज घेतले आणि ते देखील फेडले. मात्र तरीही ॲपच्या वतीने तरुणाला कर्ज फेडण्यासाठी फोन येऊ लागले. त्याने सर्व रक्कम फेडल्याचे सांगितल्यावर प्रतिनिधीने त्याला धमकाविण्यास सुरुवात केली. शिव्यांचे संदेश येऊ लागले. इतके होऊनही या तरुणाने आणखी पैसे भरण्यास नकार देताच त्याची बदनामी सुरू करण्यात आली. त्यांच्या संपर्कात असलेल्या अनेकांना या तरुणाचे मॉर्फिंग केलेले फोटो पाठविण्यात आले. कहर म्हणजे या लोन ॲपच्या प्रतिनिधींनी हा तरुण नोकरी करीत असलेल्या कंपनी मालकाच्या मुलीचेही फोटो अश्लिल पद्धतीने मॉर्फ केले. हे फोटो त्याच्या मालकाला तसेच संपर्कातील इतरही अनेकांना पाठविण्यात आले.

पोलिस तपास सुरू

अश्लिल फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्याचे त्याच्या मित्रांनी आणि मालकाने सांगितल्यानंतर या तरुणाने कुरार पोलिस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तरुणाला ज्या क्रमांकावरून फोन आले ते मोबाइल क्रमांक, लोन ॲप संदर्भातील इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिस बदनामी करणाऱ्याचा शोध घेत आहेत.