गुड न्यूज! म्हाडा कोकण मंडळाची चार हजार घरांची सोडत; ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवलीचा समावेश
बातमी मुंबई

गुड न्यूज! म्हाडा कोकण मंडळाची चार हजार घरांची सोडत; ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवलीचा समावेश

मुंबई महानगरात परवडणारी घरे दुरापास्त झाली असल्याने सर्वसामान्यांचे लक्ष म्हाडा प्राधिकरणाच्या घरांच्या सोडतीकडे लागलेले असते. मुंबई महानगराचा विस्तार होत असल्याने म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत ठाणे, विरार आदी भागात सोडतीच्या रूपात अधिकाधिक घरे उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोकण मंडळामार्फत डिसेंबरअखेरपर्यंत सुमारे चार हजारांहून अधिक घरांची सोडत काढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या सोडतीची तयारी अंतिम टप्प्यात असून सोडतीसाठी आवश्यक सॉफ्टवेअरच्या चाचणीस यश येताच सोडतीची अधिकृत घोषणा केली जाईल, असे सांगण्यात येते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोकण मंडळाकडून जाहीर केल्या जाणाऱ्या सोडतीमध्ये म्हाडा योजना, पंतप्रधान आवास योजनेसह खासगी विकासकांकडून म्हाडास मिळणाऱ्या २० टक्के घरांच्या योजनेतील घरांचा समावेश राहील. विशेष म्हणजे म्हाडास सोडतीतील २० टक्के योजनेमधून उपलब्ध होणाऱ्या सुमारे १,५०० घरांचा समावेश आहे.

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या आगामी सोडतीत ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील घरांचा समावेश आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाने १४ ऑक्टोबर २०२१ रोजी ८,९८४ घरांची सोडत काढली होती. तेव्हा, दोन लाख ४६ हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले होते. म्हाडाच्या नियमानुसार विजेत्यांची पात्रता निश्चितीसाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना घरे सुपूर्द केली. त्यापाठोपाठ एका वर्षानंतर कोकण मंडळाने चार हजारांहून अधिक घरांची सोडत काढण्याचे ठरविले आहे. त्यासाठी अर्जदारांची प्रथम पात्रता निश्चिती केली जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सॉफ्टवेअरही तयार केले आहे. म्हाडाकडून या सॉफ्टवेअरची चाचपणी सुरू असून त्यास यश येताच सोडतीचा मार्ग खुला होणार असल्याचे ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.