हिंसाचारानंतर पंजाब हरियाणात हाय अलर्ट; इंटरनेट सेवा बंद
देश बातमी

हिंसाचारानंतर पंजाब हरियाणात हाय अलर्ट; इंटरनेट सेवा बंद

नवी दिल्ली : दिल्ली हिंसाचाराच्या घटनेनंतर संपूर्ण पंजाब- हरियाणामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हरयाणातील काही जिल्ह्यातील मोबाईल सेवा बंद करण्यात आली आहे. तर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी दिल्लीतील हिंसाचारानंतर पोलीस यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्रालयाने अतिरिक्त तुकड्या तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दिल्लीत दोन महिन्यांपासून नव्या कृषी कायद्यांविरोधात शांततेत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात हिंसाचार करण्यात आला. प्रजासत्ताक दिनी निघालेल्या ट्रॅक्टर परेडच्या निमित्ताने दिल्लीत प्रवेश केल्यानंतर शेतकऱ्यांकडून बॅरिकेड्स तोडत अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली. इतकंच नाही तर विरोध करणाऱ्या पोलिसांवर तलवारी उगारण्यात आल्या. शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीने हिंसक वळण घेतलं आणि बघता बघता संपूर्ण दिल्ली हादरली.

काही आंदोलकांनी लाल किल्ल्यावर साहिब ए निशाण ध्वज फडकावला. तर दुसरीकडे पोलीस आणि शेतकरी यांच्यात प्रचंड धुमश्चक्री झाली. या हिंसेमुळे दिल्लीत तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेनंतर दिल्लीत पंजाब व हरयाणात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ट्रॅक्टर परेडदरम्यान शेतकऱ्यांनी दिल्लीत प्रवेश केल्यानंतर शेतकरी लाल किल्ल्यावर पोहोचले होते. यावेळी तिथे उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांवर शेतकऱ्यांनी काठ्यांनी हल्ला केला. यात जवळपास १५ फुटांच्या भिंतीवरुन उडी मारण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताच पर्यात नव्हता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एएनआयने हा व्हिडीओ शेअर केला आहे.