मोठी बातमी : आता राफेल कराराची फ्रान्समध्ये चौकशी होणार
देश बातमी

मोठी बातमी : आता राफेल कराराची फ्रान्समध्ये चौकशी होणार

नवी दिल्ली : भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये ३६ राफेल फायटर जेटच्या झालेल्या व्यवहाराची आता फ्रान्समध्ये न्यायालयीन चौकशी होणार आहे. फ्रान्समधील Mediapart या शोध पत्रकारिता संकेतस्थळाने राफेल कराराची चौकशी करण्यासाठी न्यायाधीशांची नियुक्ती केल्याचं वृत्त दिलं आहे. ही चौकशी संवेदनशील म्हटली गेली असून या ५९ हजार कोटींच्या करारामध्ये झालेल्या सर्व घडामोडींची चौकशी करण्यात येणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

फ्रेंच पब्लिक प्रॉसिक्युशन सर्विसेसच्या आर्थिक गुन्हे विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार, गेल्या महिन्यात १४ जून रोजी हा तपास पुन्हा सुरू करण्यात आला. त्या आधारावर आता ही चौकशी सुरू करण्यात येणार असल्याचं वृत्त मीडियापार्ट संकेतस्थळाने दिलं आहे. दोन वर्षांपूर्वी २०१९ मध्ये पीएनएफच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी या कराराला क्लीनचिट दिली होती. मात्र, आता त्याच अधिकाऱ्याचा कनिष्ठ अधिकारी पीएनएफचा प्रमुख झाला असून त्याने ही चौकशी सुरू करण्याच मंजुरी दिली आहे.

दरम्यान, काँग्रेसनं मीडियापार्टच्या याच वृत्ताचा हवाला देऊन भाजपावर निशाणा साधला आहे. फ्रान्समधील संकेतस्थळ Mediapartनं रिलायन्स आणि डसॉल्ट करारामधील सर्व पुरावे उघड केले आहेत. मोदी सरकार आणि त्यांचा प्रिय असा राफेल करार आता उघडा पडला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदीय समितीच्या चौकशीला परवानगी देतील का? असा सवाल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. त्याचबरोबर, काँग्रेसनेते खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. आपल्या ट्वीटर अकाउंटवरून राहुल गांधी यांनी चोर की दाढी… एवढे तीन शब्दच ट्वीट केले आहेत. याशिवाय, या ट्वीटमध्ये राहुल गांधींनी #RafaleScam असा हॅशटॅग देखील राहुल गांधींनी दिला आहे. त्यामुळे या ट्वीटच्या माध्यमातून राहुल गांधींनी अप्रत्यक्षपणे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच निशाणा साधल्यामुळे आता पुन्हा एकदा या मुद्द्यावरून भाजपा आणि काँग्रेस यांच्यामध्ये कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.