११वीची सीईटी २१ ऑगस्टला होणार; विद्यार्थ्यांना आजपासून भरता येणार ऑनलाईन अर्ज
बातमी महाराष्ट्र

११वीची सीईटी २१ ऑगस्टला होणार; विद्यार्थ्यांना आजपासून भरता येणार ऑनलाईन अर्ज

मुंबई : इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षेची तारखी अखेर जाहीर झाली असून २१ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत ही परीक्षा राज्यभरात पार पडणार आहे. विद्यार्थ्यांना आज (ता. २०) सकाळी ११.३० वाजेपासून २६ जुलैपर्यंत या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. राज्यात नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी इयत्ता ११वी ची सीईटी द्यावी लागणार आहे. या सीईटीच्या आधारेच विद्यार्थ्यांना विविध नामांकीत महाविद्यालयांमध्ये त्यांच्या गुणवत्तेनुसार प्रवेश मिळत असतो.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जे विद्यार्थी या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरतील त्यांना हॉल तिकीट देखील ऑनलाईन मिळणार आहेत. १०० गुणांची ही परीक्षा असणार आहे. या प्रवेश परिक्षेसाठी राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जातील. १०० गुणांच्या या परिक्षेत बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. ओएमआर उत्तरपत्रिकांद्वारे ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना दोन तासांचा वेळ दिला जाईल.

या परिक्षेतल्या गुणांच्या आधारावरच विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जाईल. जे विद्यार्थी ही परीक्षा देतील, त्यांना अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर अन्य विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. जे विद्यार्थी ही सीईटी देणार नाहीत, त्यांचे मूल्यमापन दहावीच्या गुणांच्या आधारावर केले जाईल.