राज्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांचा नवा उच्चांक; गाठला आजपर्यंतचा सर्वाधिक आकडा
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांचा नवा उच्चांक; गाठला आजपर्यंतचा सर्वाधिक आकडा

मुंबई : राज्यात कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीने पुन्हा नवा उच्चांक गाठला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात तब्बल २७ हजार १२६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याचे दिसत आहे. सलग दोन दिवस २५ हजारांवर नवीन रुग्णांची नोंद झाल्यानंतर आज नवा उच्चांक गाठला गेला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा तसेच प्रशासन हादरलं आहे. यात नागपूर, पुणे, मुंबई आणि ठाणे या शहरांत कोरोनाची सर्वाधिक रुग्णवाढ होत आहे. त्यामुळे या शहरांत आधीच कोविडचे नियम कठोर करण्यात आलेले आहेत. अशावेळी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यासाठी लॉकडाऊनसारखे कठोर आणि टोकाचे पाऊल उचलू शकतात, अशी चर्चा चालू झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात आज २७ हजार १२६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून कोरोना संसर्गाने महाराष्ट्रात शिरकाव केल्यापासूनचा हा उच्चांकी आकडा ठरला आहे. आज १३ हजार ५८८ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत एकूण २२ लाख ३ हजार ५५३ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे आता ८९.९७ टक्के एवढे आहे.

राज्यात आज ९२ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत कोरोनाने ५३ हजार ३०० जणांचा बळी गेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१८ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ८२ लाख १८ हजार १ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २४ लाख ४९ हजार १४७ (१३.४४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९ लाख १८ हजार ४०८ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ७ हजार ९५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. आजच्या आकडेवारीनुसार राज्यात १ लाख ९१ हजार ६ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात सर्वाधिक ३८ हजार ८०३ रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत.