राज्यात केवळ एक आठवडा पुरेल एवढाच रक्तसाठा
बातमी महाराष्ट्र

राज्यात केवळ एक आठवडा पुरेल एवढाच रक्तसाठा

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला असताना रक्तदानाचा वेग कमालीचा घसरल्यामुळे राज्यात केवळ आठवडाभर पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक राहिला आहे. राज्यातील सर्व रक्तपेढ्यांमध्ये मिळून केवळ २५ हजार ६०९ रक्ताच्या पिशव्यांचा साठा शिल्लक आहे तर मुंबईत केवळ ३१७८ रक्ताच्या पिशव्या रक्तपेढ्यांमध्ये उपलब्ध आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोरोना रुग्णांना एकीकडे प्लाझ्मा मिळत नाही तर दुसरीकडे गर्भवती महिलांना बाळंतपणासाठी (सिझेरियन शस्त्रक्रियेसाठी) तसेच विविध शस्त्रक्रियांसाठी रक्त मिळणे कठीण होऊन बसले आहे. राज्यभरात शिवसेनेच्या शाखा शाखांमधून रक्तदान करण्यात आले होते. सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी जागोजागी रक्तदान शिबीरांचे कोरोना काळात आयोजन केले होते. मात्र हीच परिस्थिती आगामी काळातही येणार हे ओळखून राज्य रक्तसंक्रमण परिषदेला विशेष आर्थिक मदत व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची गरज होती. मात्र अर्थसंकल्पात आरोग्य विभागाच्या तोंडाला पाने पुसण्यात आली तसेच रक्तदान कार्यक्रमासाठी कोणतीही विशेष तरतूद करण्यात आली नसल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वानुसार दुसऱ्या लसीकरणानंतर किमान २८ दिवस रक्तदान करू नये असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे रक्तदाते मिळण्यात अडचण वाढू शकते, यामुळे लसीकरणापूर्वी एकदा रक्तदान करा असे आवाहन आम्ही करत असल्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेचे प्रमुख सहाय्यक संचालक डॉ. थोरात यांनी सांगितले. राज्यात आजघडीला ३४५ रक्तपेढ्या आहेत तर मुंबईत ५८ रक्तपेढ्या असून जेमतेम आठवडाभरचा साठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात ५५ हजाराहून जास्त रक्तपिशव्यांचा साठा रक्तपेढ्यांमध्ये होता. आता केवळ २५ हजार रक्तांच्या पिशव्या शिल्लक आहेत. एकट्या मुंबईची रक्ताची वार्षिक गरज ही अडीच लाख रक्ताच्या पिशव्यांची असून महिन्याला २२ हजारापेक्षा जास्त रक्ताच्या पिशव्यांची गरज रुग्णांसाठी असते. आज केईएम, शीव, नायरसह मुंबईतील बहुतेक रुग्णालयांतील रक्तपेढ्यांमध्ये ५५ ते १०० एवढ्याच रक्ताच्या पिशव्याचा साठा शिल्लक आहे.