भरदिवसा पुलावरुन नदीत फेकला कोरोनाग्रस्ताचा मृतदेह; व्हिडिओ व्हायरल
देश बातमी

भरदिवसा पुलावरुन नदीत फेकला कोरोनाग्रस्ताचा मृतदेह; व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेले असतानाच गंगेच्या किनारी मृतदेहांचा खच सापडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती. अशात एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

हा व्हिडिओ उत्तरप्रदेशातील रापती नदीच्या पुलावरील असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडीओत पीपीई किट घातलेली एक व्यक्ती कोरोना रुग्णाचा मृतदेह ब्रीजवरुन नदीत फेकत असल्याचं दिसत आहे. युपीतील बलरामपूर जिल्ह्यात ही घटना घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी चौकशी केली असून पीडित व्यक्तीची ओळख पटवली आहे. प्रेमनाथ असं या पीडित व्यक्तीचं नाव असून ते शोहरतगढ येथील सिद्दार्थनगरचे रहिवासी होते.

बलरामपूरच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रेमनाथ यांना २५ मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान २८ मे रोजी त्यांचं निधन झालं. प्रोटोकॉलचं पालन करत प्रेमनाथ यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या कुटुंबाकडे सोपवण्यात आला. पण त्यांच्या नातेवाईकांनी मृतदेह नदीत टाकून दिला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात नदीत मृतदेह सापडले असल्याने संताप व्यक्त होत असतानाच ही घटना समोर आली आहे.